scorecardresearch

Premium

सत्ताबदलाची परंपरा कायम, राजस्थानात भाजपची सत्तेवर पकड; काँग्रेसचा दारुण पराभव

राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट, राजपूत या प्रमुख जातींची अनुकूलता भाजपसाठी सत्ता मिळवून देणारी ठरली.

bjp flag
(संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, जयपूर

राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट, राजपूत या प्रमुख जातींची अनुकूलता भाजपसाठी सत्ता मिळवून देणारी ठरली. भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.१९९ संख्याबळ असलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला ११५ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला ६९ जागांवर समाधान मानावे लागले. अन्य पक्षांनी १५ जागा मिळविल्या आहेत.

nitish_kumar_narendra_modi
बिहारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपाशी हातमिळवणी करणार?
akhilesh_yadav_mamata_banerjee_nitish_kumar
ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्या नाराजीवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसची…”
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma and Congress MP Rahul Gandhi
‘राहुल गांधींना आताच अटक करा’, काँग्रेस नेत्याची मागणी; हिमंता सर्मा म्हणाले, “निवडणुकीत ते आम्हाला हवेत…”
bhagwant man
बंगालनंतर पंजाबमध्येही काँग्रेसला मोठा झटका; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नसल्याचे केले स्पष्ट

राजस्थानमधील अंतर्गत संघर्षांमुळे त्रस्त झालेल्या भाजपने वसुंधराराजेंसारख्या दिग्गज नेत्यांची मक्तेदारी मोडून काढत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी दियाकुमारी, बाबा बालकनाथ, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्यासह केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत ठेवली होती. वसुंधराराजेंचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या समर्थक आमदारांना उमेदवारी दिली गेली असली तरी, निवडणुकीच्या प्रचारातून राजेंना दूर करून संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढली गेली. राजस्थानमध्ये मोदी हेच भाजपचे प्रमुख प्रचारक होते.

पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये महिला व दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रमक प्रचार केला. मध्य प्रदेशात काँग्रेसने शिवराज यांच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला तसा, मोदींनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ‘लाल डायरी’चा उल्लेख करत कथित भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणला. गेहलोतांचा मुलगा वैभव तसेच, प्रदेशाध्यक्ष व शिक्षणमंत्री गोविंद डोटासरा यांच्या कुटुंबीयांविरोधात ‘ईडी’ची कारवाई या दुहेरी रणनीतीचा भाजपला फायदा मिळाल्याचे दिसत आहे. इथेही मोदींनी महिला, दलित, शेतकरी आणि ओबीसी या समूहांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे आश्वासन दिल्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसत आहे.

हेही वाचा >>>जगभरात दरवर्षी २०० कोटी टन धूळ वातावरणात!

‘चिरंजीवी’ योजनेचा फायदा नाहीच

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी २५ लाखांच्या आरोग्य विम्याची चिरंजीवी योजना मतदारांपर्यंत पोहोचली होती आणि या योजनेचा काँग्रेसला राजकीय लाभ मिळण्याची आशाही वाटत होती. काँग्रेससाठी गेहलोतांची ही एकमेव लाभाची योजना होती. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, महिलांना भत्ता आदी आश्वासने दिली असली तरी, भाजपनेही हीच आश्वासने दिल्यामुळे काँग्रेसच्या रेवडींपेक्षा भाजपची रेवडी अधिक प्रभावी ठरली असे दिसते. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसचे अस्थिर सरकार वाचवण्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यश आले असल्याने त्यांना ‘जादूगार’ म्हटले जाऊ लागले होते. मध्य प्रदेशमध्ये जशी शिवराज यांच्याविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली जात होती, तशी राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्याविरोधात नाराजी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसला विजयाची आशा होती पण, गेहलोत यांच्या आमदारांविरोधात जनमत निर्माण होत गेल्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे मानले जात आहे.

गेहलोत-पायलट वादाचा फटका

काँग्रेसने ऐक्याचे चित्र उभे केले असले तरी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधील मतभेद मिटले नाहीत. त्यातच गेहलोत यांच्यावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. गेल्या वेळी पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता गृहीत धरून गुर्जर मतदारांनी काँग्रेसला मतदान केले होते. पण पायलटांना मुख्यमंत्री न केल्याचा राग गुर्जरांनी भाजपला मतदान करून व्यक्त केल्याचे सांगितले जाते. मुस्लीम, मीणा, दलित समाजातील मते काँग्रेसला मिळाल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसत असले तरी, गुर्जर, राजपूत, जाट आणि माळी वगळता अन्य ओबीसींचीही मते भाजपच्या पारडय़ात गेल्यामुळे भाजपला २०१३ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यात यश मिळाल्याचे दिसते.

मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये ध्रुवीकरण

राजस्थानातील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयोगही यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. गुर्जर समाजाचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा-शर्मा, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हिंदू मतदारांना मुस्लीम मतदारांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करणारी भाषणे लक्ष वेधणारी ठरली होती. राजस्थानच्या निवडणुकीवर पाकिस्तानची नजर असल्याचे विधान बिधुरी यांनी जाहीरपणे केले होते. पूर्व राजस्थान तसेच अन्य विभागांतील मतदारसंघांमध्ये हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा फायदा मिळवण्याची रणनीती सुरुवातीपासून अमलात आणली गेली होती. दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या तिजारा मतदारसंघामध्ये बाबा बालकनाथ यांना उमेदवारी देऊन ध्रुवीकरणाचा डाव भाजपने उघडपणे खेळला होता. बालकनाथ हे राजस्थानचे योगी असल्याचा प्रचार केला गेला. त्यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथही आवर्जून गेले होते.

ओबीसी प्रचार प्रभावहीन

मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेसने प्रामुख्याने राहुल गांधींनी ओबीसी जातगणनेचा प्रचार केला असला तरी, काँग्रेसच्या उमेदवारांनी या मुद्दय़ाकडे फारसे लक्ष दिले नाही. मोदींच्या चेहऱ्यासमोर राहुल गांधींचा ओबीसी प्रचार प्रभावहीन ठरल्याचे निकालांवरून दिसते. राजस्थानमध्ये केवळ अशोक गेहलोत यांच्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी असल्याचे चित्र उभे राहिले होते. पक्षांतर्गत एकजुटीसाठी अखेरच्या टप्प्यामध्ये खुद्द सोनिया गांधी यांना जयपूरमध्ये ठाण मांडून बसावे लागले होते. दिल्लीतील प्रदूषणामुळे सोनिया गांधी जयपूरला गेल्या होत्या असे सांगितले गेले पण, त्यांना अन्य राज्यांतही तात्पुरत्या निवासासाठी जाता आले असते. भाजपने मात्र, काँग्रेसच्या दुहीचा भरपूर प्रचार केला होता. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह व भाजप विरोधातील नाराजीचा काँग्रेसला फायदा घेता आला नसला तरी, भाजपने राजस्थानमध्ये मात्र गेहलोत सरकारविरोधाचा फायदा उठवत पुन्हा सत्ता मिळवली.

काँग्रेसचे कुशासनाला नाकारणाऱ्या आणि भाजपच्या ‘सुराज्य’ (सुशासन) स्वीकारणाऱ्या राजस्थानमधील जनतेचा हा विजय आहे. हा विजय मोदीजींना २०२४ मध्ये देशातील जनतेची सेवा करण्याची संधी देईल.- वसुंधराराजे, माजी मुख्यमंत्री, राजस्थान

निकाल अनपेक्षित – गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी विधानसभेचे निकाल प्रत्येकासाठी अनपेक्षित असल्याचे सांगितले आणि पक्षाने जनादेश नम्रपणे स्वीकारला असल्याचे सांगितले. ‘‘या पराभवावरून हे दिसून येते की आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना जनतेपर्यंत नेण्यात पूर्णपणे यशस्वी झालो नाही. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा! जुनी निवृत्तिवेतन योजना आणि चिरंजीवी आरोग्य विमा योजनेसह काँग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षांत आणलेल्या सर्व योजना पुढील सरकारने पुढे नेल्या पाहिजेत,’’ असे गेहलोत म्हणाले. दरम्यान, अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

विजयी

’मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सरदारपुरा मतदारसंघातून विजयी. भाजपच्या महेंद्रसिंह राठोड यांचा २६,३९६ मतांनी पराभव.

’माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा झालरपाटन मतदारसंघातून ५३,१९३ मतांनी विजय.

’काँग्रेस नेते सचिन पायलट टोंक मतदारसंघातून विजयी. भाजपच्या अजितसिंह मेहता यांचा २९,४७५ मतांनी पराभव.

’माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड हे जोटवारा मतदारसंघातून विजयी. काँग्रेसच्या अभिषेक चौधरी यांच्यावर ५०,१६७ मतांनी मात.

विरोधी पक्षाचे उपनेते पराभूत

राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि भाजप उमेदवार सतीश पुनिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंबर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रशांत शर्मा यांनी ९,०९२ मतांनी त्यांचा पराभव केला. पुनिया हे राजस्थानातील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister ashok gehlot lonely fight for congress in rajasthan has failed amy

First published on: 04-12-2023 at 05:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×