लखनौ, उत्तर प्रदेश : भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारीच्या प्रकरणात संभाव्य अटक टळावी यासाठी शहाजहानपूर येथील विद्यार्थिनीने केलेला अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.

या विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या मुलीने अन्य काही जणांसह चिन्मयानंद यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी तिघांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे. या मुलीविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना सीजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विधी शाखेतील या पदव्युत्तर विद्यार्थिनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला असून त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केल्यानंतर शहाजहानपूर येथील डॉक्टरांनी त्यांना अँजियोग्राफीसाठी लखनौतील  रुग्णालयात नेण्यास सांगितले होते, अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. चिन्मयानंद यांना नंतर लखनौतील संजय गांधी पदव्युत्तर संस्थेत दाखल करण्यात आले.