सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांच्यावर नव्याने आरोप झाल्याने दबावाखाली असलेला काँग्रेस पक्ष खासदार के.सुधाकरन यांच्या वक्तव्याने आणखी अडचणीत आला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्यांनीही या वक्तव्यावर टीका केली आहे.
सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणातील कथित बळी ठरलेली तरुणी ही एखाद्या वेश्येसारखी ठिकठिकाणी गेली, तिने पैसे कमावले आणि भेटीही स्वीकारल्या. या मुलीचे पूर्वचरित्र ज्यांना माहीत आहे. (बलात्काराच्या घटनेवेळी तिचे वय १६ होते ) त्यांना वस्तुस्थिती समजू शकेल. यातनांपासून सुटका करण्याची संधी अनेक वेळा तिला उपलब्ध झाली होती, पण तिने आपले ठिकाण सोडले नाही. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. बसंत यांनी तिच्याबद्दल नोंदविलेले निरीक्षण योग्य आहे. त्यांनी पुराव्याआधारेच त्यांचे म्हणणे मांडले. या तरुणीला अब्रूची चाड नव्हती. लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा हा प्रकार केरळमध्ये मान्य होईल का, हा मोठा प्रश्न आहे, असे वक्तव्य ओमानमधील मस्कत येथे माध्यमांशी बोलताना सुधाकरन यांनी केले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतरही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. वेश्याव्यवसाय आणि बलात्कार यात फरक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
सुधाकरन यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसमधील महिला नेत्यांनीही निषेध केला आहे. महिला काँग्रेसच्या नेत्या आणि काँग्रेसच्या चिटणीस शनिमोल उस्मान यांनी सुधाकरन यांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष बिंदू कृष्णा यांनीही हे वक्तव्य म्हणजे महिलांचा अवमान असल्याची टीका केली आहे.
सुधाकरन यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे केरळचे गृहराज्यमंत्री मल्लपल्ली रामचंद्रन यांनी म्हटले आहे. सुधाकरन यांच्या वक्तव्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रमेश चेन्निथला यांनी सांगितले.