पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या सभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्राने गावांच्या विकासासाठी १ रूपया पाठवला तर गावाला मिळेपर्यंत त्याचे १५ पैसे व्हायचे. अशा प्रकारेच कोट्यवधींचा निधी मिळाला तरीही प्रत्यक्षात मदत न पोहचवणारा हा ‘पंजा’ कोणाचा होता? एवढा भ्रष्टाचार करणारा पक्ष कोण? असे सूचक प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या काश्मीर प्रश्नाबाबतच्या वक्तव्यावरही ताशेरे ओढले. ‘काश्मीरला स्वातंत्र्य नको स्वायतत्ता द्या’ असे वक्तव्य शनिवारी पी चिदंबरम यांनी केले होते. तेव्हा असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही? देशातील वीर जवानांनी काश्मीरसाठी बलिदान दिले आहे. तरीही भारतात राहणारे आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री असलेले नेते असे वक्तव्य कसे करू शकतात? याची किंमत त्यांना मोजावी लागेल असेही मोदी यांनी म्हटले.

काँग्रेसचे नेते काश्मीरच्या ‘आझादी’च्या नाऱ्यांमध्ये स्वतःचा स्वर मिसळत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसला पोटशूळ उठला होता, असा खोचक टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला. कालपर्यंत सत्तेवर असलेल्या लोकांनी अचानक यू टर्न घेतलाय. कोणतीही तमा न बाळगता, ताळतंत्र सोडून काश्मीरबद्दल वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रेस पक्षाकडून देशाच्या जनतेला काहीही अपेक्षा नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांनी काश्मीर बद्दल केलेले वक्तव्य हे देशाच्या शहीद जवानांचा अपमान करणारे आहे, अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कॅशलेस व्यवहार आणि प्रणालीवर काँग्रेसने सडकून टीका केली. नोटाबंदीविरोधातही वातावरण निर्माण केले. मात्र, कॅशलेस व्यवहार हे भारताचे भविष्य आहे हे विसरू नका. सध्या देशात १२ लाख लोकांनी कॅशलेस व्यवहार करण्याचा संकल्प केला आहे. ही संख्या वाढवणे हा आमचा उद्देश आहे. आमच्यापुढे तुम्ही कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही आम्ही विकासाला गती देणार आहोत, असेही नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.