राजस्थानातील राजकीय नाट्य उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच काँग्रेसच्या आमदारांनं सचिन पायलट यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी केला आहे.

आमदारांच्या घोडेबाजारावरून राजस्थानात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर नाराज झालेल्या सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेसविरोधात बंड केलं. काँग्रेसनं परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही पायलट यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानं पक्षानं त्यांची प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली. तर विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह समर्थक १९ आमदारांना सदस्यत्व रद्द करण्याच्या नोटीसा पाठवल्या. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात असून, काँग्रेसच्या आमदारांनी सचिन पायलट यांच्याविषयी मोठा दावा केला आहे.

आणखी वाचा- “मी काय इथं भाजीपाला विकायला नाहीये, मी…”; पायलट यांच्यावर गेहलोत संतापले

काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह म्हणाले,”मी रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. ना मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपावाल्यांनी माझ्यासोबत कधीही चर्चा केली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावणं हे चुकीचं आहे. माझी चर्चा सचिन पायलट यांच्याशी झाली होती. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले होते जितके हवे तितके पैसे घ्या असं म्हणाले होते. ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ते उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांची माहिती दिली होती. त्यावर ते मला म्हणाले होते की सगळं काही ठिक होईल,” अशी माहिती आमदार गिरीराज सिंह यांनी दिली.

आणखी वाचा- ‘ते’ आमदार गेहलोत यांच्याविरोधात जाऊ शकतात; भाजपाच्या मित्रपक्षाचा दावा

सचिन पायलट समर्थकांनी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असून, सचिन पायलट यांच्या गटाच्या बाजून प्रसिद्ध वकील हरिश साळवे हे बाजू मांडत आहेत. तर विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करत आहेत.