मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिद सईदची नजरकैदेतून सुटका झाली. यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘नरेंद्र भाई, गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेतली होती. यावरुनच राहुल यांनी मोदींना टोला लगावला.

‘नरेंद्र भाई, गळाभेटीने काहीही साध्य झाले नाही. दहशतवादाचा मास्टरमाईंड मोकाटच आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान सैन्याला लष्कर फंडिंगबाबतही क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता मोदी आणि ट्रम्प यांच्या आणखी गळाभेटी घेण्याची आवश्यकता आहे,’ असे ट्विट करुन राहुल गांधींनी मोदींना चिमटा काढला. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची दोनच दिवसांपूर्वी नजरकैदेतून सुटका झाली. याप्रकरणी अमेरिका कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारला होती. मात्र, यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बाबतही पाकिस्तानी लष्कराला क्लीन चीट दिली. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरुनच राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकच्या संसदेने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे पाकिस्तानला अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सैन्यासोबत हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करावी लागेल. मात्र, या विधेयकात लष्कर-ए-तोयबाचा समावेश नाही. लष्कर-ए-तोयबा ही हाफिज सईदची संघटना आहे. या विधेयकात लष्कर-ए-तोयबाचा समावेश करण्यावरुन पाकिस्तान आणि अमेरिकेत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती.

राहुल गांधी यांनी याआधीही मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीची खिल्ली उडवली होती. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यावर ट्रम्प यांची गळाभेट घेतल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याची गरज व्यक्त केली होती. यावर राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य करत, ‘ट्रम्प यांची आणखी एक गळाभेट घेण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींवर हल्ला चढवला होता.