लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणे हा विषय अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास त्यांच्याकडून देशाचे संविधानात बदल केला जाईल, असा आरोप काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी केला आहे. त्यावर भाजपाने काँग्रेस काळात संविधानात कितीवेळा दुरुस्ती केली गेली, याची आकडेवारी सादर केली. मात्र आता काँग्रेसच्याच एका नेत्याने संविधान आमच्यावर लादले असल्याचे विधान केले आहे. या विधानानंतर पुन्हा एकदा संविधानावरून वाद निर्माण झाला असून भाजपाने या विधानावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विरिएटो फर्नांडिस म्हणाले की, पोर्तुगीजांपासून गोव्याला १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान आमच्यावर थोपविण्यात आले. विरिएटो फर्नांडिस यांच्या या विधानावार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टीका केली असून त्यांचे हे विधान धक्कादायक तर आहेच, पण काँग्रेस पक्ष लोकशाहीला कसा मारक आहे, हे यातून दिसते, असे ते म्हणाले.

भाजपा उमेदवाराकडून पुन्हा एकदा संविधान बदलण्याची भाषा; काँग्रेसकडून टीका

सोमवारी (दि. २२ एप्रिल) एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत असताना फर्नांडिस यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे विधान उद्धृत केले. नेहरू म्हणाले होते की, गोवा स्वतःची नियती ठरवू शकते. पुढे १९८७ साली गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला. पण तरीही गोव्याला स्वतःची नियती ठरविता आली नाही. फर्नांडिस यांनी गोव्यातील ज्या नागरिकांना पोर्तुगालचे नागरिकत्व घेतले आहे, त्यांच्या दुहेरी नागरिकत्वाचेही समर्थन केलेले आहे.

फर्नांडिस यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही बाब काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याही कानावर घातली असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींशी बोलताना मी म्हणालो होतो की, १९६१ साली गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान आमच्यावर थोपविण्यात आले. फर्नांडिस त्यावेळी एका एनजीओमध्ये काम करत होते, ज्यांचा उद्देश गोव्यातील नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाला पाठिंबा देणे होते.

संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती

फर्नांडिस यांच्या विधानानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्स वरून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवाराचे संविधान गोव्यावर थोपविण्याबाबतचे विधान ऐकून मला धक्काच बसला. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची धारणा होती. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने १४ वर्ष उशीर केला. आता काँग्रेसचे उमेदवार संविधानाची पायमल्ली करण्याची भाषा वापरत आहेत.

देशाचे तुकडे करण्याचे राजकारण काँग्रेसने थांबवावे, असाही टोला प्रमोद सावंत यांनी लगावला. काँग्रेसने ही भारत तोडोची भाषा तात्काळ थांबविली पाहीजे. काँग्रेस पक्ष लोकशाहीसाठी धोका आहे, अशीही टीका प्रमोद सावंत यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitution was forced on us says goa congress leader viriato fernandes bjp slams kvg