सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना

करोनाची तिसरी लाट अधिक हानिकारक असेल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे या करोनालाटेस सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गुरुवारी केली. प्राणवायूचा संरक्षित साठा करण्याची गरजही न्यायालयाने व्यक्त केली.

करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा  केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर प्राणवायू पुरवठ्याच्या मुद्द्यावरून न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिल्ली सरकार आणि केंद्राची कानउघाडणी केली. प्राणवायूअभावी दिल्लीत अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. त्यामुळे प्राणवायू वितरण आणि पुरवठ्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सहकार्याने काम करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने  दिल्ली सरकार आणि केंद्राला दिले.

‘‘करोनाची तिसरी लाट येणार असून, ती मुलांसाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आमच्या वाचनात आले आहे. आताच पूर्वतयारी केली तर या करोनालाटेस सामोरे जाता येईल. त्यासाठी प्राणवायूचा संरक्षित साठा असला पाहिजे. केवळ प्राणवायू वाटप करून जमणार नाही, तर त्याचा रुग्णालयांना अखंडित पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी’’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही दिल्लीला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा दिल्लीचे वकील अ‍ॅड. राहुल मेहरा यांनी न्यायालयात मांडला, मात्र केंद्राने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दिल्लीला ७०० मेट्रिक टनऐवजी ७३० मेट्रिक टन प्राणवायू पुरवठा करण्यात येत असल्याचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड यांनी प्राणवायू वाटपाच्या केंद्राच्या सूत्राचा फेरविचार होण्याची गरज व्यक्त केली.

 

देशात ४१२२६२ रुग्ण, ३९८० करोनाबळी

’देशात दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींच्या संख्येने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत चार लाख १२ हजार २६२ रुग्ण आढळले, तर ३९८० रुग्णांचा मृत्यू झाला.

’देशातील एकूण रुग्णसंख्या

दोन कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहोचली, तर मृतांची संख्या दोन लाख ३० हजार १६८ झाली.

’देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून ही संख्या ३५ लाख ६६ हजार ३९८ वर पोहोचली आहे.