थिरुवनंतपूरम : केरळमधील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून राज्य सरकार करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत अपयशी ठरल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून अशा अनाठायी टीकेतून लोकांचा करोनाविरोधी लढ्याला असलेला पाठिंबा कमी करण्याचा हेतू असावा, असा संशय व्यक्त केला आहे.

माकपचे मुखपत्र असलेल्या चिंथा या साप्ताहिकात  मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, समाजातील एक वर्ग राज्याच्या साथरोग व्यवस्थापन धोरणावर टीका करून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न ठरवून करीत आहे. यातून त्यांना सरकारविरोधी भावना निर्माण करायची आहे.  करोनाविरोधी मोहिमेबाबत लोकांना गांभीर्य राहू नये, अशी स्थिती त्यांना निर्माण करायची आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांवर केला.

राज्यात विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ त्याचप्रमाणे भाजपनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या आठवड्यात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्र्यांना मौन सोडण्याचे आवाहन केले होते.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘‘जर केरळमधील करोना प्रतिबंधक उपाय चुकीचे असतील, तर मग आता कोणते प्रारूप (मॉडेल) राज्याने स्वीकारायला पाहिजे?’’ प्राणवायूच्या कमतरतेमुळे राज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. आपत्तीच्या काळात कोणालाही उपचार नाकारण्यात आले नाहीत किंवा रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.