नवी दिल्ली : दिल्लीत १ सप्टेंबरपासून पुन्हा शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या, आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरू लागतील. मात्र, या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू झाल्यानंतर सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांबाबत विचार केला जाणार आहे.

दिल्लीतील शाळा सुरू करण्याआधी लोकांचा कल जाणून घेण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या सर्व्हेक्षणात ७० टक्के पालकांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्याबाबत अनुकूलता व्यक्त केली होती. शुक्रवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. आत्ता शाळांमध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिकवले जाणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.  दिल्लीतील करोनाचा संसर्गदर ०.१ टक्के आहे.

शिवाय, ९८ टक्के शालेय शिक्षकांनी किमान एक लसमात्रा घेतली असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही विद्याथ्र्याला शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. नववी ते बारावीचे खासगी शिकवणी वर्ग, अन्य शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या जातील. दिल्ली विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयेही नियमितपणे सुरू होतील.

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने प्राथमिक शाळांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. अन्य राज्यांमध्ये उच्च माध्यमिक शाळा भरत असल्यामुळे दिल्लीतील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.