उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराच्या भिंतीवरच आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्काराचा खर्च कोणाला करावा लागू नये म्हणून भिंतीवर ५००-५०० च्या नोटाही चिटकवण्यात आल्या होत्या. या नोटांखाली हे पैसे आमच्या अंत्यसंस्कारासाठी वापार असं लिहिण्यात आलं होतं.

गुलशन वासुदेव असं आत्महत्या करणाऱ्या कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्यवसायामधील तोटा आणि नातेवाईकांनीची विश्वासघात केल्याने वासुदेव कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पत्नीच्या मदतीने त्यांनी मुलगा ऋतिक आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी आपल्या मोठ्या मुलीसहीत आठव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यासंदर्भात भिंतीवर लिहीलेल्या मजकुरामध्ये राकेश वर्मा यासाठी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. राकेश हा गुलशन यांचा मेहुणा असल्याची माहिती समोर आली आहे. राकेशने आपल्या भावाची फसवणूक केल्यानेच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा आरोप गुलशन यांचा सख्खा भाऊ असणाऱ्या हरीश यांनी केला आहे. जीन्स कपड्यांच्या धंद्यामध्ये आपली दोन कोटींची फसवणूक झाली असून यासाठी राकेशच जबाबदार असल्याचे वासुदेव कुटुंबाने लिहिलेल्या आत्महत्येच्या मजकुरामध्ये म्हटलं आहे.