करोना व्हायरसमुळे अजूनही मुलांच्या शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे घरातूनच मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. लॅपटॉप किंवा मोबाइलच्या माध्यमातून मुलं शाळांच्या या ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. कर्नाटातील मांडयामध्ये मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल फोन देणं, एका पित्याला चांगलच महाग पडलं. या मोबाइलमधून त्याची दुसरीच भानगड बाहेर आली.

मुलगी ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यासाठी मोबाइल चाळत असताना तिला वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजले. वडिलांचा दुसऱ्या एका महिलेसोबतचा प्रणयाचा व्हिडीओ तिला सापडला. तिने लगेच याबद्दल आईला सांगितले. हा प्रकार बाहेर आल्यानंतर कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आहे. मांडयाच्या नागामंगला तालुक्यात हे कुटुंब राहते. पोलीस आणि सामाजिक संस्था आता वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीला आता विभक्त व्हायचे आहे. पण नवरा त्यासाठी तयार नाहीय. त्यांच्या लग्नाला १८ वर्ष झाली आहेत. या जोडप्याला दोन मुली आहेत. नवऱ्याने विवाहबाह्य संबंधाचे गुपित दडवून ठेवले होते. पण ऑक्टोबर महिन्यात मुलीला १२ व्या इयत्तेच्या ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्याने आपला मोबाइल दिला. हा फोन चाळत असताना तिला वडिलांचा दुसऱ्या एका महिलेसोबत व्हिडीओ दिसला. त्या माणसाने प्रणयाचा तो व्हिडीओ रेकॉर्ड करुन मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. पतीच्या या प्रकरणाबद्दल समजल्यानंतर महिलेने पोलिसात आणि महिला संघटनांकडे धाव घेतली व कारवाईची मागणी केली.