उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बालात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन दलित तरुणीची जीभ छाटून तिची मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे नाजूक स्थिती असलेल्या या तरुणीची गेल्या १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

पीडित तरुणीने सवर्ण समाजातील चार तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामुहिक बलात्काराचं कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केलं होतं. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली.

तरुणीच्या मृत्यूपूर्वी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामुहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. या मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, “त्यांच्या घराजवळ राहणारा २० वर्षीय सवर्ण समाजातील तरुण आणि त्याचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देत असतात.” पीडित मुलगी ज्या गावामध्ये राहते त्या गावात एकूण ६०० कुटुंबांपैकी केवळ १५ दलित कुटुंब आहेत. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.