स्त्रीमध्ये गर्भधारणा होते त्या वेळी स्त्री व पुरूष प्रजातीचे भ्रूण सारख्याच प्रमाणात आकार घेतात, पण काहीवेळा नैसर्गिक कारणांमुळे तर अनेकदा स्त्री भ्रूणांची हत्या केल्याने पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी होत जाते. अमेरिकेसारख्या विकसित देशात ते नैसर्गिकरित्या धोक्यात येण्याचे प्रमाणही जास्त आहे, असे अमेरिकेतील संशोधकांचे मत आहे.
प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अहवालानुसार ही माहिती स्त्री-पुरूष गुणोत्तरातील फरक समजून घेण्यासाठी उपयोगाची आहे.
अमेरिकेत स्त्री भ्रूण मारण्याचे प्रमाण कमी असले तरी तीन ते सहा दिवसांचे जे भ्रूण बाह्य़ प्रजनन पद्धतीने तयार केलेले असतात ते गर्भपात, अ‍ॅमिनोसेनटेसिस आदी कारणांनी मरतात. हार्वर्ड विद्यापीठ व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी हा अहवाल तयार केला आहे.
वैज्ञानिकांच्या मते गर्भधारणेत स्त्री व पुरूष प्रजातीच्या भ्रूणांचे प्रमाण सारखेच असते, पण अधिशयन काळात विशेषत: गर्भधारणेच्या पहिल्या आठवडय़ात पुरूष भ्रूण मरण्याचे प्रमाण अधिक असते, पुरूष प्रजातींच्या भ्रूणांची अनैसर्गिक वाढही स्त्री प्रजातीच्या भ्रूणांपेक्षा अधिक असते. १० ते १५ व्या आठवडय़ात स्त्री प्रजातीचे भ्रूण मरण्याची शक्यता जास्त असते. नंतरच्या काळात पुन्हा पुरूष प्रजातीचे भ्रूण मरण्याची किंवा पडण्याची संख्या स्त्री भ्रूणापेक्षा अधिक असते. हे प्रमाण गर्भधारणेच्या २८ ते ३५ दरम्यानच्या आठवडय़ात असते. सगळी परिस्थिती लक्षात घेता स्त्री प्रजातीचे भ्रूण पडण्याची शक्यता पुरूष प्रजातीचे गर्भ पडण्यापेक्षा जास्त असते. मानवी विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे असले तरी नैसर्गिक व कृत्रिम कारणांनी स्त्रीभ्रूणांचे टिकण्याचे प्रमाण घटत राहिले तर ते धोकादायक आहे.
अगोदरच्या संशोधनानुसार पुरूष प्रजातीचे भ्रूण जास्त प्रमाणात तयार होतात, पण गर्भावस्था काळात स्त्री प्रजातीच्या भ्रूणांपेक्षा पुरूष प्रजातीचे भ्रूण मोठय़ा प्रमाणात मरतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. आताचा निष्कर्ष नेमका त्याच्या उलट आहे.