दिल्लीत सुरू असणाऱ्या भारतीय विज्ञान महोत्सवात एक नवा जागतिक विक्रम रचला जाणार आहे. या महोत्सवासाठी शनिवारी उपस्थित असणारे ५५० शालेय विद्यार्थी विख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइनच्या वेशभुषेत अवतरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी आइनस्टाइनची ओळख असलेले हिरव्या रंगाचे स्वेटर्स, टाय, डोक्यावर पांढऱ्या केसांचा भलामोठा टोप आणि पांढरी मिशी असा वेष धारण केला आहे. यापूर्वी अल्बर्ट आइनस्टाइनसारखी वेशभुषा करून एकाच जागी जमण्याचा विक्रम कॅलिफोर्नियातील शाळेने केला होता. २०१५ मध्ये या शाळेचे ३०४ विद्यार्थी आइनस्टाइनसारखी वेशभुषा करून एकत्र जमले होते. मात्र, आता हा जागतिक विक्रम दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या नावे होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांना मोठे पुरस्कार जिंकण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांना स्वत:मधील किलर इंस्टिक्ट वाढवावे लागेल. तसेच विज्ञानाप्रतीची विद्यार्थ्यांमधील आवड वाढविली पाहिजे. पुढील २० ते ४० वर्षात हे सातत्याने घडेल तेव्हा आपल्याला सी.व्ही. रमन यांच्यासारखा आणखी एखादा शास्त्रज्ञ मिळू शकतो, असे मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.