दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केला आहे. केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५८ मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केजरीवालांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “दिल्लीमध्ये ऑपरेश लोटसला अपयश आलं”, असं म्हणत केजरीवालांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा- काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ NSUI च्या ३६ विद्यार्थी नेत्यांचा राजीनामा

वाद घातल्यामुळे तीन भाजपा आमदारांना बाहेरचा रस्ता

दिल्लीत विधानसभेत ७० आमदारांपैकी ‘आप’चे ६२ आमदार असून, भाजपाचे आठ आमदार आहेत. अधिवेशनादरम्यान उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजपा आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले होते.

ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’

भाजपाने आपचा एकही आमदार फोडला नाही, हे सिद्ध करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. आप सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राजधानीतील वातावरण चांगलेच तापले आहे. “ हे ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’ आहे. भाजपा ‘आप’चा एकही आमदार खरेदी करू शकला नाही, हे सिद्ध करण्यासाठी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत आहोत”, असे केजरीवाल शुक्रवारी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना म्हणाले होते.

हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गौतम अदानींवर अमेरिकेत खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण, घ्या जाणून

‘आप’चे तीन आमदार गैरहजर

विधानसभेत आम आदमी पक्षाचे एकूण ६२ आमदार आहेत. त्यापैकी दोन आमदार देशाबाहेर आहेत, एक तुरुंगात आहे. चौथा सदस्य हा सभागृहाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आमच्या बाजूने एकूण ५८ मते पडली. प्रत्यक्षात पक्षाचे तीन आमदार विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहू शकले नसल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.