दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मिळवलेल्या विजयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. पुण्यामध्ये पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्ली निवडणुकींच्या निकालासंदर्भात आपले मत मांडले. यावेळी केजरीवाल यांचे अभिनंदन करण्याबरोबरच पवारांनी भाजपाचा समाचार घेतला.

दिल्ली विधानसभेच्या निकालाचे आश्चर्य वाटलं नसल्याचं पवारांनी सांगतले. “हा निकाल म्हणजे मोदी आणि शाह यांच्या अहंकाराला कंटळल्याचे दाखवतो,” असा टोलाही पवारांनी भाजपाला लगावला आहे. झारखंडपाठोपाठ दिल्लीमध्येही भाजपाचा पराभव झाल्याच्या मु्द्द्यावरुन “भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही,” मत पवारांनी नोंदवलं. यावेळेस पत्रकारांनी पवारांना भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे सांगत यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली. त्यावेळेस पवारांनी अगदी खोचकपणे, “मतांची टक्केवारी वाढलीय हे उदाहरण ६० च्या दशकामध्ये समाजवादी पक्षही देत असे. भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली असली तरी त्यांच्या १०० टक्के पराभव झाला आहे,” असं उत्तर दिलं. पुण्यामधील याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पवारांनी, “दोन समाजांमधील धार्मिक भावनांचा मुद्दा बनवून भाजपाने प्रचार केला. गोळी मारासारख्या घोषणाही भाजपाने प्रचारामध्ये दिल्या. या सर्वाला जनतेने मतपेटीमधून योग्य उत्तर दिलं आहे,” असं मत व्यक्त केलं.

भाजपाच्या जागा वाढल्या

दिल्लीमध्ये मतमोजणीची सुरुवात झाल्यापासून मागील सात तासांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार आपने ६३ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपाने सात जागांवर आघाडी मिळवली आहे. २०१५ साली आपने ६७ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. यंदा भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही.