लाडक्या लेकीवर झालेले अमानवीय अत्याचार.. सर्वाधिक अत्याचार करणारा नराधम अल्पवयीन म्हणून सुटला.. देशभरातून उमटलेला संतापाचा सूर.. गेली तीन वर्षे न्यायासाठी वणवण करणारे ‘निर्भया’चे पालक राज्यसभेत ऐतिहासिक बाल न्याय सुधारणा विधेयकावरील चर्चेचे साक्षीदार झाले. पाणावलेले डोळे.. काहीसे आशावादी.. इंग्रजीत चालणारी चर्चा काळजीपूर्वक ऐकत होते. विधेयक मंजूर झाले.. तरी त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी नाराजीची छटा होती.. आपल्या लेकीवर अन्याय करणारा तो ‘अल्पवयीन नराधम’ अजूनही मोकाटच असल्याचा संताप अजूनही खदखदत होता..!
दुपारी दोन-अडीचच्या सुमारास ‘निर्भया’चे पालक राज्यसभेच्या प्रेक्षक दीघ्रेत आले. राज्यसभा निरखून पाहू लागले. त्यांच्यासमवेत महिला काँग्रेस अध्यक्षा शोभा ओझा होत्या. चर्चा सुरू झाली. चर्चेदरम्यान होणारे वाद-विवाद त्यांना काहीसे अस्वस्थ करीत होते. पाचेक तासानंतर विधेयक मंजूर झाले. निर्भयाचे पालक राज्यसभेतून बाहेर पडले. त्याबरोबर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याभोवती गर्दी केली. अनावर अश्रू तसेच ठेवत ते संसदेच्या आवारातून बाहेर पडले. ‘निर्भया’ची आई प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलते- आम्ही मोडून पडलो आहोत.. उदास आहोत.. पण आम्ही आमची लढाई सुरूच ठेवू. लेकीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधात लढा देत राहू.. गेल्या चार दिवसांपासून निर्भयाचे पालक दिल्लीत विविध नेत्यांच्या गाठीभेठी घेत आहेत.