संपूर्ण देशाला हादरवणाऱया दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या खटल्याचा निकाल गुरुवारी न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकला. दिल्लीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. गितांजली गोएल यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी गेल्या ५ जुलै रोजी संपली होती. त्यानंतर खटल्याचा निकाल २५ जुलैला देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. गुरुवारी हा निकाल पाच ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला.
दिल्लीमध्ये गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींपैकी एकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे त्याच्यावर बाल गुन्हेगारी कायद्यांतर्गत वेगळी सुनावणी घेण्यात आली. या खटल्यात संबंधित आरोपी दोषी आढळल्यास त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. खटल्याच्या सुनावणीवेळी संबंधित अल्पवयीन आरोपीने त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.