नोटबंदीमुळे कालबाह्य झालेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बाळगणाऱ्या दोघांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गोध्रा भागात ही कारवाई करण्यात आलेली असून, अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ कोटी ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी झुबेर हयात आणि फारुख छोटा या आरोपींना अटक केली आहे. मात्र या छापेमारीदरम्यान इद्रीस हयात हा मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. गुजरात ATS विभागाने गोध्रा भागात जुन्या नोटांची अवैध अदलाबदल होणार असल्याची माहिती गुजरात पोलिसांना दिली होती. गुजरात पोलिसांचं पथक गोध्रा शहरातील धंत्या प्लॉट परिसरात पोहचले असता त्यांना एका गाडीत जुन्या नोटांची बंडलं लपवून ठेवल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली, परंतू मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला.

कारवाईत पोलिसांनी ९ हजार ३१२ जुन्या १००० च्या नोटा आणि ७६ हजार ७३९ जुन्या ५०० च्या नोटा जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ही ४ कोटींपेक्षा जास्त होते. फरार आरोपी इद्रीस हयातवर याआधीही अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल असून गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या नोटांचं हे आरोपी काय करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.