एक चोर दुर्गा देवीच्या मंदिरात आला. त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला आणि देवीची पूजा केली. नमस्कार केला, स्वतभोवती प्रदक्षिणा मागून देवीची माफी मागितली. त्यानंतर देवीचे दागिने आणि मुकुट चोरुन पोबारा केला. सीसीटीव्हीमध्ये हे सगळं काही दिसतं आहे. देवभोळा चोर असंच या चोराचं वर्णन करता येईल. हैदराबाद येथील गन फाऊंड्री भागात असलेल्या दुर्गादेवी मंदिरात ही घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी साधारण ६ .२० च्या दरम्यान ही चोरी झाली.

या मंदिरात चोर आला, काही मिनिटं त्याने देवीची पूजा केली. त्यानंतर त्याने देवीची माफी मागितली. आधी हात जोडून नमस्कार केला, त्यानंतर कान धरुन माफी मागितली. तसंच त्याने वाकून देवीच्या मूर्तीला नमस्कारही केला आणि त्यानंतर चोरी केली. देवीच्या मूर्तीवरील दागिने आणि मुकुट चोरुन या चोराने पोबारा केला. द न्युज मिनिट या वेबसाईटने हे वृत्त दिले आहे. सुरुवातीला या चोराने मुकुटाला हात लावला. हा मुकुट सहज काढता येणं शक्य नाही हे त्याला कळलं. मग त्याने पूजा-अर्चा सुरुच ठेवली. त्यानंतर देवीच्या मूर्तीवरचा मुकुट त्याने खेचला. तो घेऊन त्याने पळ काढला. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोराचा शोध पोलीस घेत आहेत.