उत्तर प्रदेशात एका डॉक्टरने दलित रुग्णाला हात लावण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर या डॉक्टरने रुग्णाला स्ट्रेचरवरुन धक्का दिला. जौनपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशव प्रसाद आपले वडिल नरेंद्र प्रसाद यांच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी आपल्या वडिलांना हात लावण्यास नकार दिल्याचा आरोप केशव प्रसाद यांनी केला आहे. दलित असल्या कारणाने डॉक्टरने हात लावण्यासाठी एक हजार रुपये मागितले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पीडित केशव प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१७ मे रोजी आपल्या वडिलांची प्रकृती नाजूक असल्याने आपण त्यांना घेऊन रुग्णालयात गेलो होतो. रुग्णालयात गेल्यावर आपण स्वत: त्यांना स्ट्रेचरवर ठेवलं आणि डॉक्टरांना लवकराच लवकर उपचार करण्याची विनंती केली. पण तिथे उपस्थित डॉक्टरांनी आपल्या जातीवरुन अपमान करत, उपचार करण्यासाठी पैसे मागितले”.

नातेवाईकांनी मागणीचा विरोध करताच डॉक्टरचा पारा चढला. इतकंच नाही तर डॉक्टरने स्ट्रेचरवर असलेल्या आपल्या वडिलांना जोराचा धक्का दिल्याचा आरोप केशव प्रसाद यांनी केला आहे. स्ट्रेचवरुन खाली पडल्याने नरेंद्र प्रसाद यांचा तिथेच मृत्यू झाला. केशव प्रसाद यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. रुग्णालयाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.