डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली; जबाबदारी कठीण असल्याची जाणीव

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होऊन केवळ १०० दिवस झाले आहेत, तर या पहिल्या १०० दिवसांतच ट्रम्प यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे किती कठीण आहे याची जाणीव झाली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्षपदाचे काम हे किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना नव्हती, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली.

मला माझे पूर्वीचे आयुष्य अधिक आवडायचे, आधी मी जेवढे काम करायचो त्यापेक्षा नक्कीच आता काम वाढले आहेत, असे ट्रम्प म्हणाले. मला अध्यक्षपदाचे काम सोपे वाटत होते. मी पूर्वी भरपूर गोष्टी करू शकत होतो, पण आता त्यावर र्निबध आले आहेत. मला काम करायला आवडते, पण या कामाचा व्याप खरोखर मोठा आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

मेक्सिको सीमेवर भिंत तयार करणे सहज शक्य आहे, इराणसोबत चर्चा करणे काही कठीण नाही, देशावरील कर्जावर मात करणेदेखील आपल्याला सहज जमणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.

२०१६च्या अध्यक्ष निवडणुकांदरम्यान अमेरिकेतील बहुतांश लोकांनी डोनाल्ड ट्रम्प पदाचा भार सांभाळण्यास सक्षम नसल्याचे सांगितले होते.  ‘ओबामा केअर’ आरोग्य धोरणात बदलण्यामध्ये विलंबाबत बोलताना, ट्रम्प यांनी सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार करणे इतके अवघड असेल अशी कुणालाही माहीत नव्हते असे म्हटले होते. त्याचप्रमाणे चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोरियन द्वीपकल्पाची स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली होती.