उत्तर प्रदेश आणि राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर झाला असून जवळपास १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. वादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून अनेक ठिकाणी वीज गायब झाली आहे. विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. बुधवारी आलेल्या या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडली असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचंही नुकसान झालं आहे.

वादळामुळे रात्री अनेक ठिकाणी वीज कोसळली. रात्रीच्या वेळी लोक झोपेत असतानाच काही घरं कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. उन्हाळ्यात या भागांमध्ये नेहमी वादळ येत असतं. मात्र वादळामुळे इतक्या लोकांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

उत्तर प्रदेशात ६५ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी अर्ध्याहून जास्त आग्र्यामधील आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. झाडं आणि भिंती कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी माती आणि विटांपासून बनवलेली घरं असल्याने त्यांना फटका बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांनी स्वत: बचावकार्य आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

राजस्थानमधील तीन जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला आहे. अलवार, भारतपूर आणि ढोलपूर येथील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. अलवारला सर्वात जास्त फटका बसला आहे. वादळामुळे जिल्ह्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.