सार्वजनिक निधी हडपल्याच्या आरोपाखाली इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष होस्नी मुबारक यांना येथील न्यायालयाने बुधवारी तीन वष्रे कारावासाची शिक्षा सुनावली़  ८६ वर्षीय मुबारक यांची तीन दशकांची हुकूमशाही राजवट तीन वर्षांपूर्वी जनतेने केलेल्या उठावानंतर उलथून पाडण्यात आली होती़
राजवाडय़ाचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली तब्बल १७.९ दशलक्ष डॉलरचा निधी हडपल्याप्रकरणी होस्नी यांचे दोन पुत्र अला मुबारक (५३) आणि गमल मुबारक (५०) यांनाही दोषी धरण्यात आले असून त्यांना प्रत्येकी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आह़े  या तिघांनाही १७.६ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला असून २.९ दशलक्ष डॉलरची नुकसानभरपाई शासकीय तिजोरीत जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़  तीन दशके इजिप्तवर राज्य करणाऱ्या मुबारक यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचे आणि २०११ साली सत्तापालटासाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांची हत्या करण्याचा कट आखल्याचेही आरोप आहेत़
गेल्या वर्षी मुबारक यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती़  मात्र त्यांना कैरोच्या उपनगरातील लष्करी रु ग्णालयात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आह़े