कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या नेहा हिरेमठ या मुलीचा तिच्याच महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण खून करण्यात आला. खून करणारा हा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्याला काही तासातच पोलिसांनी अटकही केली. मात्र या हत्येनंतर हुबळीमधील राजकारण तापले आहे. नेहाचा खून करणारा आरोपीचे नाव फयाज असल्यामुळे भाजपाने या मुद्दयावर राज्यातील काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कालपासून (दि. १८ एप्रिल) महाविद्यालय परिसरात तीव्र निषेध आंदोलन छेडले असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहा हिरेमठ ही २३ वर्षीय विद्यार्थीनी हुबळीच्या बीव्हीबी महाविद्यालयात मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) चे शिक्षण घेत होती. याच महाविद्यालयाच्या आवारात फयाजने नेहाची हत्या केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर गुन्हा कैद झाल्यामुळे त्याची दाहकता सर्वांसमोर आली. नेहाचा पाठलाग करून तिच्यावर सपासप वार केल्यामुळे नेहाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनीही नेहावर अनेक वार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. हत्या करून पळ काढणाऱ्या फयाजला स्थानिकांच्या मदतीने तासाभरातच अटक करण्यात आली.

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य

नेहाच्या वडिलांनी काय सांगितले?

नेहाचे वडील आणि काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, फयाजला ते ओळखत होते. त्याने नेहाचा नाद सोडून द्यावा, तिचा पाठलाग करू नये, असे त्याला बजावण्यात आले होते, असे सांगितले. हिरेमठ पुढे म्हणाले, “फयाजने नेहावर त्याचे प्रेम व्यक्त केले होते. मात्र नेहाने फयाजला स्पष्ट नकार दिला होता. तिला तो अजिबात आवडत नव्हता. नेहा अशा गोष्टींपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. नेहाने फयाजचा प्रस्ताव तर नाकारलाच शिवाय आपण वेगवेगळ्या समाजातून येतो, त्यामुळे त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असेही तिने स्पष्ट केले होते. मात्र तरीही फयाजने माझ्या मुलीचा बळी घेतला.”

निरंजन हिरेमठ एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, प्रेमाला नकार दिल्यामुळे आरोपीने हे कृत्य केले आहे. याआधी आम्ही आरोपीशी चर्चा केली होती. आम्ही हिंदू आहोत, तुझे कुटुंब मुस्लीम धर्मीय आहे. त्यामुळे या नात्याला आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे आम्ही त्याला स्पष्ट सांगितले होते.

लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा भाजपाचा आरोप

भाजपाने मात्र हे प्रकरण लव्ह जिहादजे असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सदर प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. यात लव्ह जिहादचा विषय आहे. जेव्हा पीडित मुलीने आरोपीच्या प्रेमाला नकार दिला, त्यातूनच हा गुन्हा घडला. काँग्रेसच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

दरम्यान काँग्रेस सरकारने भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, नेहा आणि फयाज या दोघांमध्येही प्रेमसंबंध होते. कदाचित नेहा दुसऱ्याबरोबर लग्न करणार असल्याचा राग मनात धरून फयाजने टोकाचे पाऊल उचलले असावे. या प्रकरणातील सर्व माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. मात्र दोघांमध्येही प्रेमसंबंध असल्यामुळे हे लव्ह जिहादचे प्रकरण होत नाही.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, या प्रकरणातून समाजात भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यांना हे करता येणार नाही. कायदा त्याचे काम नक्कीच करेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fayaz killed neha hiremath karnataka government says no love jihad in hubballi murder case kvg
Show comments