तुर्कीमधील अंकारामध्ये झालेल्या अयशस्वी लष्करी  उठावामध्ये फेतुल्लाह दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे तुर्की परराष्ट्र मंत्री मौलूदा काउसोगलू यांनी स्पष्ट केले. जगभरात विखुरलेल्या या संघटनेने भारतामध्ये घुसखोरी केल्याची माहिती काउसोगलू यांनी दिली. काउसोगलू यांनी रविवारी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतामध्ये शिरकाव करणाऱ्या फेतुल्लाह दहशतवादी संघटनेवर (फेटा) योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र लढा देण्याची  गरज असल्याचेही काउसोगलू यांनी यावेळी म्हटले. तुर्कीमधील अंकारामध्ये लोकशाहीला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी तुर्कीतील लोकशाहीचे समर्थन केले होते. भारताने तुर्कीला दिलेल्या समर्थनाबद्दल काउसोगलू यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले. तुर्की परराष्ट्रमंत्र्यांच्या खुलाशानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरुप यांनी तुर्कीतील घटनेबद्दल भारत संवेदनशील असल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा फेटा विरोधात योग्य कारवाईसंबंधी विचार करत असल्याचे म्हटले आहे. तुर्कीमधील अंकारामध्ये झालेल्या हल्ल्यात  २४० पेक्षा अधिक लोक ठार झाले होते. तर १५०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तुर्कस्तानात लष्कराचे बंड घडवून आणण्यात हात असल्याचा आरोप सध्या अमेरिकेत असलेले मुस्लीम धर्मगुरू फेतुल्लाह गुलेन यांनी मात्र यापूर्वीच फेटाळला आहे. दरम्यान तुर्कस्तान आजही दहशतवादाच्या जाळ्यात सापडल्याचे दिसते. रविवारी  तुर्कीतील गजनीटेप शहरातील एका विवाहसोहळ्यात आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू तर ९० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.