गोव्यातील कलंगुट पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला बेकायदा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडे असलेला पासपोर्टही अवैध असल्याचे समोर आले आहे. या नागरिकाचे नाव ख्रिस असे असल्याचे समजले असून तो २८ वर्षांचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून पोलिसांनी काही अंमली पदार्थांसह गांजाही जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना ख्रिसकडे बेकायदा अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तो बागा बीचवर असल्याचेही समजले होते. दळवी यांनी एक पथक तयार केले आणि छापा मारून या नागरिकाला अटक केली. त्याच्याकडे असलेला गांजा ५ हजार रूपयांचा आहे.

ख्रिस या नायजेरियन नागरिकाकडे असलेला पासपोर्टही अवैध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या नायजेरियन नागरिकाला कोर्टात हजर केले जाणार आहे. सध्या पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हे आणि इतर पोलीस त्याची चौकशी करत आहेत. उप निरीक्षक प्रजित मांद्रेकर, पोलीस हवालदार प्रसाधन तालकर, गोरक्ष शेतकर हे सगळेच ख्रिसच्या अटकेदरम्यान हजर होते असेही एएनआयने म्हटले आहे.