ग्रेटर नोएडात शॉपिंग मॉलमध्ये १८ वर्षांच्या तरुणीवर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तरुणानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी आमच्या मुलीचा पाठलाग करत होता, असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ग्रेटर नोएडामध्ये राहणारी खुशबू नामक तरुणी एका शॉपिंग मॉलमध्ये काम करत होती. शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कुलदीप (वय २५)  मॉलमध्ये गेला. दुकानासमोर आल्यावर कुलदीपने खुशबूला बाहेर बोलावले. त्याने खुशबूला बोलण्याच्या बहाण्याने पहिल्या मजल्यावर नेले. दोघांमध्ये काही बोलणे झाले. यानंतर खुशबू तिथून निघत असताना कुलदीपने तिच्यावर चाकूने वार केले. हा प्रकार बघून मॉलमध्ये काम करणारे कर्मचारी तिथे पोहोचले. यानंतर कुलदीपने तिथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. चाकूचा धाक दाखवत तो पळ काढत होता. या गोंधळात ५ ते १० मिनिटे झाली होती. तोवर या घटनेची माहिती मॉल बाहेर ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पोलीस मॉलमध्ये आल्याचे बघताच कुलदीप पुन्हा खुशबूजवळ गेला आणि स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान खुशबूचा मृत्यू झाला असून कुलदीपची प्रकृती स्थिर आहे. कुलदीपविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कुलदीप गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या मुलीचा पाठलाग करत होता. काही दिवसांपूर्वीच आम्ही कुलदीपच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांनाही हा प्रकार सांगितला होता. कुलदीपने पाठलाग करणे थांबवले नाही तर पोलिसांकडे जाऊ असे आम्ही त्यांना सांगितले होते, असे खुशबूच्या आईने सांगितले. मात्र, यानंतरही कुलदीप खुशबूला त्रास देत होता, असा आरोपही तिच्या आईने केला.