‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेचे पर्वितन झाले असून, या नव्या करप्रणालीबाबतच्या सर्व निर्णयांतील राज्यांच्या सहभागामुळे संघराज्य सहकाराचा नवा आदर्श पाहायला मिळाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला महिना पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी या करासह विविध विषयांवर भाष्य केले.

‘‘जीएसटीमुळे एक मोठे स्वप्न सत्यात उतरले आहे.  हा कर लागू करताना त्याचा भार गरिबांवर पडणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. गरिबांना अत्यावश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती कमी असल्याबद्दल अनेकांकडून आलेल्या पत्रामुळे मला समाधान वाटते,’’ असे मोदी म्हणाले.

‘जीएसटी’ ही केवळ करसुधारणा नसून, अर्थव्यवस्थेतील नव्या संस्कृतीची रुजुवात आहे. या करप्रणालीने अल्पावधीतच आपल्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम घडवला. सुमारे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात झालेल्या इतक्या मोठय़ा ऐतिहासिक करबदलाची दखल जगभरातील विद्यापीठेही घेतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त  केला.

पूरग्रस्त राज्यांना मदत

पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यात येत असल्याचे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. पीकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

आसाम, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगालमधील या पूरग्रस्त राज्यांत लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि निमलष्करी दल बचावकार्य करीत आहेत.

२०२२ पर्यंत सांप्रदायिकता, जातीवादाचे उच्चाटन करा

मोदी यांनी या वेळी ‘भारत छोडो’ चळवळीचा दाखला दिला. आता सांप्रदायिकता, जातीवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, दारिद्रय़ आदींच्या उच्चाटनाचा संकल्प करू या, असे मोदी म्हणाले. भारताला भेडसावणाऱ्या समस्यांचे २०२२ पर्यंत निवारण करण्यासाठी आणि ‘नवा भारत’ घडविण्यात आपले योगदान द्या, असे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती

गेला महिनाभर मला नागरिकांची पत्रे येत आहेत; पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीवर बोलावे अशी त्यांची विनंती होती. या लोकांचे मी अभिनंदन करतो, कारण त्यांना पर्यावरणाची जाणीव आहे. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याला आता १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून देशातील लोकांची स्वातंत्र्यासाठी जी एकजूट केली त्या योगदानाबाबत यावर्षी निबंध स्पर्धा, चर्चा आयोजित कराव्यात. गणेशोत्सवाला लोकमान्यांच्या मूल्यांआधारे नवे रूप द्यावे. पर्यावरण रक्षणासाठी मातीच्या गणेशमूर्ती वापराव्यात, त्यातून पारंपरिक मूर्तिकारांना रोजीरोटी मिळेल, असे आवाहन त्यांनी केले.