गुजरात सरकारने २६ जिल्ह्यांमध्ये ४६ आमदारांचा समावेश असणाऱ्या जिल्हा पोलीस तक्रार केंद्रांची स्थापना केली आहे. गुजरात पोलीस कायदा २००७ नुसार या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस तक्रार केंद्र स्थापन केलं जाणार आहे. मात्र नियुक्त करण्यात आलेल्या या ४६ आमदारांमध्ये सर्वाधिक धक्कादायक आणि चर्चेतलं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांचे. कंधाल जडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

कंधाल हे ‘गॉडमदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘संतोखबेन जडेजा’ यांचे पुत्र आहेत. कंधाल यांच्याविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही कंधाल यांचाच पोरबंदर जिल्हा पोलीस तक्रार केंद्राचे सदस्य म्हणून समावेश करुन घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कंधाल यांच्याबरोबरच भाजपाचे आमदार आणि गुजरात सरकारमधील माजी मंत्री बाबू बोखिरिया यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. कंधाल यांच्याविरोधात बंदुकीचा धाक दाखवणे, विस्फोटक सामान बाळगणे, खंडणी, मारहाण, फसवणूक आणि पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासारखे गुन्हे दाखल असल्याचे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

कसं काम करतं हे पोलीस तक्रार केंद्र?

सर्व सामान्य जनतेला कोणत्याही पदावरील अधिकाऱ्याविरोधात तक्रार करायची असेल तर त्याला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा पोलीस तक्रार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. गुजरात सरकारकडून या जिल्हा पोलीस तक्रार केंद्रांसाठी सदस्य म्हणून विधानसभेतील आमदारांची नियुक्ती केली जाते. सरकारने याच केंद्रांच्या कारभारामध्ये स्थानिक नेत्यांचाही समावेश असावा म्हणून १९ ऑगस्ट रोजी या केंद्रांचे सदस्य म्हणून काही आमदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांबरोबरच विरोधी पक्षातील तीन काँग्रेसच्या आमदारांचाही समावेश आहे. यामध्ये जामनगरचे आमदार विक्रम मदाम, गिर सोमनाथचे आमदार विमल चौदसामा आणि जुनागढचे आमदार भागाभाई बराड या तीन काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे या समितीचे अध्यक्ष असतील. तर पोलीस उप-अधीक्षक सचिव म्हणून काम पाहतील. एक अतिरिक्त दंडाधिकाराही सदस्य म्हणून काम पाहणार आहे.

कंधाल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

कंधाल जडेजा यांच्याविरोधात दाखल असणाऱ्या १५ गुन्ह्यांपैकी ३ गुन्हे हे मारहाण आणि दंगल भडकवण्यासंदर्भातील असून हे गुन्हे ते आमदार असताना दाखल करण्यात आले आहेत. १५ पैकी १० गुन्हे पोरबंदर जिल्ह्यात, तीन राजकोट आणि दोन अहमदाबाद शहराच्या हद्दीतील पोलीस स्थानकांमध्ये नोंदवण्यात आलेत. १९९४ पासून कंधाल यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे संदर्भ आढळून येतात. १९९४ साली बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी कंधाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. १९९५ साली मोढा आणि २००५ साली केशू ओडेडरा हत्या प्रकरणामध्ये त्यांच्याविरोधात खटला चालवण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी कंधाल जडेजा यांची पत्नी रेखा जडेजा यांची हत्या करण्यात आली.