गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे. कछ परिसरातून ही घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे. भारतात दहशतवादी हल्ला करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा मुख्य हेतू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा सुरक्षा दल आणि भारतीय तटरक्षक दलासोबत सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.

अदानी पोर्ट्स आणि एसईझेड यांनी एक पत्रक जाहीर केलं असून यामध्ये सांगण्यात आलं आहे की, “तटरक्षक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने प्रशिक्षण दिलेले कमांडोंनी हरामी नाला खाडी क्षेत्रातून कछ भागात प्रवेश केला आहे. त्यांना पाण्यामधून हल्ला करण्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे”.

“गुजरातमधील परिस्थिती बिघडू नये यासाठी सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंद्रा बंदरावरील सर्व जहाजांना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याचे तसंच सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे”, अशी माहितीह पत्रकात देण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी सांगण्यात आल्या आहेत त्यामध्ये पूर्ण तयारी आणि बारीक लक्ष ठेवण्याचा आदेश आहे. यासोबतच संवेदनशील ठिकाणी शक्य तितकी जास्त मदतीची तयारी ठेवावी. याशिवाय एखादी व्यक्ती किंवा बोट संशयित दिसल्यास त्यांना बंदरावजळ आणण्यात यावं. तसंच बंदराजवळ सतत गस्त घालणे आणि कार्यालय, नजीकच्या घरांजवळ असणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे.