नवी दिल्ली : दिल्ली आणि हरिद्वार येथे आयोजित केलेल्या दोन स्वतंत्र कार्यक्रमांत केल्या गेलेल्या द्वेषमूलक भाषणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी, अशी विनंती देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांना वकिलांनी केली आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद, दुष्यंत दवे आणि मीनाक्षी अरोरा यांच्यासह ७६ वकिलांनी सरन्यायाधीश रमण यांना पत्र दिले आहे. त्यात दिल्ली आणि हरिद्वार येथील कार्यक्रमात केलेली जाहीर वक्तव्ये केवळ द्वेषमूलक नाहीत, तर संपूर्ण समुदायाची हत्या करण्यासाठी दिलेली ती चिथावणी आहे, असे म्हटले आहे. ही वक्तव्ये देशाची एकता आणि एकात्मतेसाठी घातक आहेत. तसेच लाखो मुस्लिमांच्या जीवाला धोका निर्माण करणारी आहेत, असेही या पत्रात पुढे नमूद केले आहे.

आताची वक्तव्ये ही गेल्या काही काळापासून करण्यात येणाऱ्या प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणांच्या मालिकेचाच भाग आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज आहे, असेही विधिज्ञांनी या पत्राद्वारे सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, धर्म संसद कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाविरोधात िहसाचारास चिथावणी दिल्याप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी यांच्यासह इतरांवर हरिद्वार जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा कार्यक्रम हिंदूू युवा वाहिनीतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यागी यांनी (पूवाश्रमीचे वसीम रिझवी) अत्यंत प्रक्षोभक भाषण केले होते. त्याच्या ध्वनीचित्रफीती समाज माध्यमांध्यमांवर प्रसारित झाल्या.

आणखी दोघांविरुद्ध गुन्हा

देहरादून : हरिद्वार येथे नुकत्याच झालेल्या धर्मसंसदेत मुस्लीम समाजाविरुद्ध द्वेषमूलक भाषणे केल्याप्रकरणी आणखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये शनिवारी स्वामी धरमदास आणि साध्वी अन्नपूर्णा यांची नावेही अंतर्भूत करण्यात आली. या मेळाव्याचे चित्रीकरण तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे हरिद्वार कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी राकिंदर सिंह यांनी सांगितले.

याआधी केवळ वसीम रिझवी, ज्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर जितेंद्र नारायणसिंह त्यागी असे नाव धारण केले आहे, त्यांचेच नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये होते. ही एफआयआर गेल्या आठवडय़ात गुरुवारी नोंदविण्यात आला होता.