गुरुवारी हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाजवळ शाळेच्या बसला झालेल्या भीषण अपघात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी जखमी झाले होते. याप्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक केली आहे. यामध्ये बसचालक आणि आणखी एका शिक्षकाचा समावेश आहे. तसेच ईदनिमित्त सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत का बोलवण्यात आलं, यासंदर्भात शाळा प्रशासनालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा – माहितीच्या अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास SBI चा नकार, कारण काय?

गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हरियाणाच्या महेंद्रगडमधील जीएल पब्लिक स्कूलच्या बसला भीषण अपघात झाला होता. ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस झाडावर आदळून पटली झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शाळेच्या मुख्यध्यापिका, आणखी एक शिक्षक आणि बसचालक अशा तिघांना अटक केली आहे.

याशिवाय ईदनिमित्त शाळेला सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत का बोलवण्यात आलं, यासंदर्भात शाळा प्रशासनालाही नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्येच या बसचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाले होते.

ईदनिमित्त शाळेला सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत का बोलवण्यात आलं, यासंदर्भात आम्ही शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच बसच्या चालकासह शाळेच्या मुख्यध्यापिका आणि आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लवकरच बसच्या चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याचा तपासही आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया कनिना पोलीस उपअधीक्षक महेंद्र सिंह यांनी दिली.

हेही वाचा – के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक

याशिवाय महेंद्रगडच्या उपायुक्ता मोनिका गुप्ता यांनी सांगितले की, ही शाळा सार्वजनिक सुट्टी असतानाही सुरू होती. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठवला आहे. तसेच हरियाणाचे वाहतूक मंत्री असीम गोयल यांनी राज्यातील सर्व शाळांच्या बसची फिटनेस तपासणी करण्याचे निर्देश दिल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.