हरयाणामधील कुरुक्षेत्र तीन लहान मुलांच्या हत्येने हादरले आहे. काकाने दोन पुतण्या आणि पुतणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या पित्यालाही अटक केली आहे. त्यानेच भावाला सुपारी देऊन तिन्ही मुलांची हत्या घडवल्याचा संशय असून पोलिसांनी पित्याला अटक केली.

कुरुक्षेत्र जिल्ह्यातील सारसा गावात राहणारी समीर (११), सिम्रन (८) आणि समर (३) हे तिन्ही भावंड रविवारी घराबाहेरुन बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शोधमोहिमेत ग्रामस्थही सहभागी झाले. सारसा आणि लगतची गावं पिंजून काढली तरी मुलांची माहिती मिळत नव्हती. या शोधमोहिमेत मुलांचे वडील आणि काका देखील सहभागी झाले होते. मात्र शोधमोहिमेदरम्यान वडील सोनू मलिक याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती. मुलं काही मिनिटांसाठी नजरेआड गेली तर आई- वडिल चिंतातूर होतात. मात्र या प्रकरणात सोनू काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्यामुळे पोलिसांना कुटुंबातील व्यक्तीच या घटने मागे असावी असा संशय आला.

पोलिसांनी सुरुवातीला सोनूचा चुलत भाऊ जगदीप मलिकला अटक केली. त्याने चौकशीत दोन्ही पुतण्या आणि पुतणीची हत्या केल्याची कबुली दिली. तिन्ही मुलांची गोळी झाडून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह मोरनी हिल्स येथील घनदाट जंगलात फेकल्याची माहिती त्याने दिली. मंगळवारी पोलिसांनी जंगलातून मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले. जत्रेला जाऊया असे सांगत जगदीपने कारमधून तिन्ही मुलांना मोरनी हिल्स येथील घाटात नेले. तिथे निर्जनस्थळी अत्यंत जवळून तिन्ही मुलांवर गोळी झाडली.

जगदीपने सोनूच्या सांगण्यावरुनच तिघांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी सोनूलाही अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी सुरु असून, हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनूचे हिमाचल प्रदेशमधील महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. १० महिन्यांपूर्वी घरात यावरुन वादही झाला होता. किमान त्या लहान मुलांच्या भविष्यासाठी त्या महिलेचा नाद सोडून दे, असे कुटुंबीयांनी सोनूला सांगितले होते.