अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. बाबरी मशीद प्रकरणातील प्रमुख याचिकाकर्ते हशिम अन्सारी यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यान दास यांची भेट घेतली. यामध्ये तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापुढे नवी योजना ठेवण्याबाबत चर्चा झाली. विश्व हिंदू परिषदेचा या चर्चेशी काही संबंध नसल्याचे दास यांनी स्पष्ट करत टीकास्त्र सोडले.
नव्या प्रस्तावानुसार वादग्रस्त मुद्दय़ावर न्यायालयाबाहेर तोडगा काढणे, यामध्ये वाद असलेला ७० एकरांचा जो परिसर आहे त्यामध्ये मशीद व मंदिराची उभारणी करणे. त्यांच्या मधोमध १०० फूट उंच भिंतीची उभारणी करणे याचा विचार करण्यात आल्याचे हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी ज्ञानदास यांनी स्पष्ट केले. अन्सारी यांनी मुलगा इक्बालसह ज्ञानदास यांची भेट घेतली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० मध्ये दिलेल्या निकालानंतर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.
प्रस्तावाच्या मसुद्यातील चर्चेचे अंतिम मुद्दे तयार करत असून, ते सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवले जातील असे ज्ञानदास यांनी सांगितले. या प्रकरणी पंतप्रधानांना भेटून त्यांचे सहकार्य मागितले जाणार आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर दोन्हीकडील प्रमुख धर्मगुरूंच्या स्वाक्षरीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर तो सार्वजनिक केला जाईल. या प्रस्तावाबाबत सर्व हिंदू नेत्यांशी चर्चा केल्याचे ज्ञानदास यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेला केवळ जातीय तणाव वाढवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला. राम मंदिर व बाबरी मशिदीची जवळजवळ उभारणी करावी. मधोमध शंभर फुटांपेक्षा मोठी भिंत उभारावी म्हणजे भविष्यात काही गडबड होणार नाही. अयोध्येच्या सीमेबाहेर मशिदीची उभारणी करावी या विश्व हिंदू परिषदेच्या प्रस्तावाला विरोध असल्याचे ज्ञानदास यांनी स्पष्ट केले.