नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाल्यानंतर बुधवारी पक्षाला हडबडून जाग आली. भाजपच्या ‘कमळ मोहिमे’पासून सुखविंदरसिंह सुक्खू यांचे सरकार वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने डी. के. शिवकुमार, भूपेंदर हुडा व भूपेश बघेल या निरीक्षकांना सिमल्याला पाठवले आहे. सहा बंडखोर आमदारांसह इतरही आमदारांशी हे नेते चर्चा करतील. मात्र निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाणार असून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>> मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र

मुख्यमंत्री सुक्खू आमदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा सुक्खू यांनी अपमान केल्याचा आरोपही विक्रमादित्य यांनी केला आहे. वीरभद्र हे विक्रमादित्य यांचे वडील आहेत. विक्रमादित्य भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात असून त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही असतील तर सुक्खू सरकार धोक्यात येऊ शकते. ‘विक्रमादित्य माझ्या लहान भावासारखे आहेत, त्यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही सुक्खू यांनी सांगितले.

सुक्खू हे प्रियंका गांधी-वढेरा यांचे निकटवर्तीय मानले जातात. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर केंद्रीय नेतृत्वाने वीरभद्र सिंह यांची पत्नी, तसेच मुलगा विक्रमादित्य यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा अव्हेरून सुक्खू यांना मुख्यमंत्री केले होते. तेव्हापासूनच विक्रमादित्य गट नाराज असल्याचे सांगितले जात होते. विक्रमादित्य यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, मात्र तो मागे घेतला. या गटातील आमदारांनी दिल्लीकडे केंद्रीय नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, लक्ष दिले गेले नसल्याने काँग्रेसअंतर्गत गटबाजी दिसली.

भाजप आमदारांचे विधानसभेतून निलंबन

विधानसभाध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी बुधवारी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केल्यानंतर अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर केला गेला. त्यामुळे सुक्खू सरकारसमोरील संकट तूर्त टळले.

मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी आहे. -सुखविंदरसिंह सुक्खू, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh political crisis congress struggles to save govt in himachal zws