चिनी मुस्लिम महिलांबरोबर निकाह झालेल्या पाकिस्तानी पुरुषांची चिंता सध्या वाढली आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतातून शेकडो पाकिस्तानी पुरूषांच्या चिनी मुस्लीम पत्नी बेपत्ता झाल्या आहेत. मूळचे पाकिस्तानी असलेले चौधरी जावेद अत्ता यांचे शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या मुस्लिम महिलेबरोबर लग्न झाले. चौधरी जावेद अत्ता यांनी वर्षभरापूर्वी शेवटचे आपल्या पत्नीला पाहिले होते. पत्नीसोबत शिनजियांगमध्ये राहणारे अत्ता हे व्हिसा नूतनीकरणासाठी म्हणून पाकिस्तानला गेले होते. त्या दरम्यान त्यांची पत्नी बेपत्ता झाली.

तुम्ही निघून गेल्यानंतर लगेच ते लोक मला कॅम्पमध्ये घेऊन जातील. त्यानंतर मी कधीही परतून येऊ शकणार नाही हे तिचे अखेरच शब्द होते असे चौधरी जावेद अत्ता यांनी सांगितले. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांचे पत्नीबरोबर अखेरचे बोलणे झाले होते. चौधरी अत्ता आणि त्यांची चिनी पत्नी अमिना मानाजी यांच्या लग्नाला १४ वर्ष झाली आहेत. अत्ता हे पाकिस्तानी व्यावसायिक आहेत. फक्त माझीच एकटयाची पत्नी बेपत्ता झालेली नाही. माझ्यासारखे आणखी २०० जण आहेत असे अत्ता यांनी सांगितले.

चौकशी केल्यानंतर चिनी यंत्रणांनी या मुस्लिम महिलांना शैक्षणिक केंद्रामध्ये ठेवल्याचे सांगितले. चीनकडून धर्मामध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे चीनमधल्या मुस्लिम प्रांतात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. मुस्लिम महिलांना ज्या ठिकाणी ठेवले आहे त्याला चिनी यंत्रणा शाळा म्हणतात पण ते एक प्रकारचे तुरुंगच आहेत असे चौधरी अत्ता यांनी सांगितले.

यापूर्वी जगात जेव्हा कधी इस्लामवर अन्याय झाला आहे तेव्हा पाकिस्तानने जाहीरपणे विरोध केला आहे. खरंतर चीनमधल्या मुस्लिमांवर अन्याय होत असताना पाकिस्तानने निषेध व्यक्त केला पाहिजे होता. पण राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे पाकिस्तान आणि अन्य मुस्लिम देश शांत आहेत. विरोध केला तर चीन गुंतवणूक काढून घेण्याचा धोका आहे. चीनने सीपीईसी प्रकल्पातंर्गत पाकिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.