राज्यात परिचारिका त्यांच्या मागण्यांसाठी निषेध आंदोलन करीत असताना आपण महिलांच्या गोऱ्या रंगाबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नाही. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून बातम्या देण्यात आल्या, असा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला आहे.
पार्सेकर यांनी पीटीआयला सांगितले की, आपण असे कुठलेही वक्तव्य केलेले नाही, जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
१०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेच्या परिचारिकेने काल असा आरोप केला की, पार्सेकर यांनी आपल्याला भर सूर्यप्रकाशात उपोषण करू नका असा सल्ला दिला, कारण सूर्याच्या उन्हाने तुमचा गोरा रंग काळा पडेल असे ते म्हणाले होते.
अनुषा सावंत या परिचारिकेने सांगितले की, आम्ही आमच्या मागण्यांसाठी पोंडा येथे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो तेव्हा मुलींनी उन्हात उपोषणास बसून नये, त्यामुळे तुमचा गोरा रंग काळा होईल व तुम्हाला नवरा मिळणार नाही असा सल्ला त्यांनी दिला. पार्सेकर यांनी मात्र आपण निषेध व्यक्त करणाऱ्या परिचारिकेला ओळखतो. त्यामुळे आपण तिला उन्हात उपोषणास न बसण्याचा सल्ला दिला. आपण तिच्या विवाहाविषयी काही बोललो नाही, केवळ सहज काढलेले ते उद्गार होते. त्या मुलीला आपण मागेही पाहिले होते व आताही पाहिले तेव्हा तिच्यात फरक दिसला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 ते म्हणाले की, गोव्यातील निदर्शकांनी मोबाईल फोनवर संभाषण ध्वनिमुद्रित केले आहे व जर आपण अशी वक्तव्ये केल्याचे कुणाला वाटत असेल तर त्यांनी ध्वनिमुद्रण तपासून पहावे.गोव्यातील १०८ क्रमांकाच्या सरकारने मान्यता दिलेल्या खासगी संस्थेच्या रूग्णवाहिकेत काम करणाऱ्या परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीही उपोषण केले होते होते.
त्यांनी असा आरोप केला की, ही खासगी संस्था केवळ तेरा रूग्णावाहिका उपलब्ध करून देते प्रत्यक्षात त्या संस्थेला ३३ रूग्णावाहिकांचे पैसे सरकार देत आहे.