आपल्या नवऱ्याचे वर्तन एका स्त्रीसारखे आहे. मित्रांबरोबर वावरताना त्यांची पत्नी असल्यासारखा तो वागतो. एक पत्नी म्हणून आपल्याला नवऱ्याकडून काहीही सुख मिळाले नाही असा आरोप गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने नवऱ्यावर केला आहे. ३१ वर्षीय पीडित महिलेने नवऱ्याच्या विरोधात फसवणूक, घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.

हे जोडपे आता एकत्र राहत नसून नवरा आपल्याबरोबर पुरुषासारखा कधी वागला नाही असा आरोप पीडित महिलेने केला आहे. काही महिन्यांपूर्वी आपण बंगळुरुला गेलो होतो. त्यावेळी आपला नवरा त्याच्या मित्रांबरोबर पत्नी असल्यासारखा वागत होता असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सहा महिन्यांपूर्वी नवरा आणि सासरकडच्या मंडळीनी १ लाख रुपये हुंडयामध्ये मागितले होते असा आरोप या महिलेने केला आहे.

सदर महिला एसजी रोडवरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहते. १२ मार्च २०१८ रोजी कुटुंबियांच्या इच्छेनुसार आपण लग्न केले. १८ मार्चला आपण हनिमूनसाठी मनालीला गेलो आणि आठवडयाभराने परत आलो. त्यानंतर नवरा नोकरीसाठी बंगळुरुला गेला आणि मला हुगळीला काकांकडे पाठवून दिले. आपल्यासोबत राहण्याचा नवऱ्याला भरपूर आग्रह केला पण प्रत्येकवेळी तो काही तरी कारण काढून टाळायचा असे या महिलेने सांगितले.

२९ मे रोजी माझ्या आई-वडिलांनी मला नवऱ्याकडे बंगळुरुला पाठवून दिले. तिथे मी १४ जुलै पर्यंत होती. या काळात तो पुरुषा सारखा वागला नाही किंवा पत्नी म्हणून मला कुठलेही सुख दिले नाही. त्याचे मित्र भेटायला आम्हाला घरी यायचे तेव्हा तो त्यांची पत्नी असल्यारखा वागायचा असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. नवऱ्याच्या या वर्तनाला कंटाळून पत्नी आई-वडिलांच्या घरी निघून गेली व तिने तक्रार नोंदवली.