scorecardresearch

“माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला, त्यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे

What Rahul Gandhi Said?
आपल्या समारोपाच्या भाषणात काय म्हणाले आहेत राहुल गांधी?

मी भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही शेवटचे चार दिवस म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये जाल तेव्हा कारने फिरा. पायी फिरू नका. कारण तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. मात्र काश्मीरमध्ये ग्रेनेड नाही मिळाला. उलट लोकांनी आनंदाश्रूंनी माझं स्वागत केलं. काश्मीरवासीयांचं प्रेम मला मिळालं. मी असाही विचार केला की या निमित्ताने आपण विरोधकांना माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी द्यावी. ती मी दिली होती. मात्र असं काहीही घडलं नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आज काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला त्यावेळी राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

मला हे सांगण्यात आलं की तुम्हाला भारत जोडो यात्रेत शेवटचे चार दिवस कारने जायला हवं. जर तुम्ही पायी चाललात तर तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. त्यावेळी विचार केला की मी आपल्या घरातल्या लोकांसोबतच चालणार आहे. मला काय होणार आहे. जे माझा तिरस्कार करतात त्यांना मी एक संधी देतो ना. माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग बदलावा. मला महात्मा गांधींची शिकवण आहे की जगायचं तर न घाबरता जगायचं आहे. मी चार दिवस दिले होते की माझा टी शर्ट रंगवायाचा असेल तर लाल रंगात रंगवा. मला जम्मूच्या लोकांनी ग्रेनेड हल्ला नाही दिला तर मला भरभरून प्रेम दिलं. मी आता जम्मू काश्मीरच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमचं दुःख दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन.

मी हिंसा पाहिली आहे सहन केली आहे

मी हिंसा पाहिली आहे, सहन केली आहे. ज्याने हे पाहिलेलं नाही त्यांना हे कळणार नाही. मोदी, अमित शाह, आरएसएस चे लोक यांनी हिंसा पाहिलेली नाही. ते घाबरतात. मी चार दिवस पायी चाललो मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाजपाचा एकही नेता अशा प्रकारे चालू शकत नाही. कारण त्यांना भीती वाटते.

देशाची शक्ती तुमच्यासोबत उभी आहे

आज तुम्ही बर्फात उभे आहात पण तुमच्यापैकी कुणालाही थंडी वाजत नाहीये. सगळे पावसात उभे होते पण कुणी भिजलं नाही. थंडी असूनही तुम्हाला थंडी वाजत नाहीये कारण देशाची शक्ती तुमच्यासोबत आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंकाचं भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण मी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. संपूर्ण देशात आम्ही पायी चाललो.

…आणि माझं गर्वहरण झालं

खरं सांगायचं तर तु्म्हाला अजब वाटेल पण मी गेली अनेक वर्षे दररोज आठ दहा किमी धावतो. देश आपल्याला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणं सोपं असेल असं वाटलं होतं. मला वाटलं होतं की हे फार कठीण नाही. मी बराचसा व्यायाम करत होतो त्यामुळे थोडा गर्व मला झाला होता. तसं होणं अगदी स्वाभाविकही आहे पण नंतर गोष्टी बदलल्या. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी फुटबॉल खेळत असे. एकदा कॉलेजमध्ये फुटबॉल खेळत असताना मला दुखापत झाली होती. मी ही गोष्ट विसरून गेलो होतो कारण नंतर गुडघा दुखणं बंद झालं होतं. मात्र कन्याकुमारीपासून चालू लागलो त्यानंतर पाच दिवसांनी गुडघा ठणकू लागला. माझा सगळा गर्व त्याच क्षणी संपला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मला जी बाब सोपी वाटली होती ती माझ्यासाठी कठीण झाली. मात्र हे मी नंतर करून दाखवलं.

मला भारत जोडो यात्रेने खूप काही शिकवलं

मला या भारत जोडो यात्रेने खूप काही शिकवलं आहे. अनेकदा मला वेदना व्हायच्या पण मी त्या सहन करायचो. एकदा रस्त्यात मला खूप वेदना होऊ लागल्या. त्यानंतर सहा-सात तास चालायचं होतं. त्यावेळी मला वाटलं आज मला पुढे जाता येणं कठीण आहे. त्यावेळी माझ्याकडे एक लहानगी मुलगी धावत आली. तिने मला लिहिलेल्या काही ओळी दिल्या. मला तिने सांगितलं की या ओळी तुमच्याचसाठी आहेत पण आत्ता वाचू नका नंतर वाचा. मी नंतर त्या ओळी वाचल्या तेव्हा त्यात त्या मुलीने लिहिलं होतं की मला हे दिसतं आहे तुमच्या गुडघ्यामध्ये दुखापत झाली आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावर त्या वेदना दिसतात. मी तुमच्यासोबत पुढे येऊ शकत नाही. पण मला माहित आहे की तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी चालत आहात असं तिने लिहिलं होतं. त्या सेकंदात माझ्या वेदना त्या क्षणी गायब झाल्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

चार लहान मुलं एक दिवस अचानक माझ्याजवळ आली आणि..

मी जेव्हा चालत होतो त्याचवेळी थंडी वाढत होते. त्यावेळी चार लहान मुलं आली. ही लहान मुलं भीक मागत होती. त्यांच्याकडे कपडेही नव्हते. मी पाहिलं ती मुलं बहुदा मजुरीही करत असावीत. मी त्यांना भेटलो, त्यांची गळाभेट घेतली. त्यासाठी मी गुडघ्यांवर बसलो होतो. त्यावेळी मला कळलं की ती मुलं थंडीने आणि भुकेने व्याकूळ झाली होती. मी विचार केला की आता जर ही मुलं स्वेटर्स नाही घालत, त्यांच्याकडे जॅकेट नाही तर आपणही ते घालायला नको. आज मला हे सगळं सांगायला संकोच वाटतो आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मी जेव्हा त्या मुलांना भेटलो तेव्हा एकाने मला कानात सांगितलं की लहान मुलं अस्वच्छ आहेत त्यांच्याजवळ जाऊ नका. त्यावेळी मी पटकन त्यांना सांगितलं की ही लहान मुलं आपल्यापेक्षा खूप चांगली आणि निर्मळ आहेत.

मी जेव्हा काश्मीरच्या दिशेने येत होतो तेव्हा मी विचार करत होतो की याच रस्त्याने मी खालून वर चाललो होतो. त्यावेळी याच रस्त्याने अनेक वर्षांपूर्वी माझे नातेवाईक वरून खाली आले. अलहाबादला जाऊन स्थायिक झाले. मी जेव्हा काश्मीरच्या दिशेने जात होतो तेव्हा मी आपल्या घरीच चाललो आहे असं मला वाटलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. या दोघींमध्ये एक नातं आहे. महात्मा गांधी वैष्णव जन तो हा मंत्र देऊन गेले आहेत. मी माझं कुटुंब सोबतच आहे असं समजूनच मी इथे आलो. माझ्या कुटुंबाने छोटंसच काम केलं होतं.

इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा मी १४ वर्षांचा होतो

मी सामान्य नागरिक, लष्कर, बीएसएफ सगळ्यांना सांगू इच्छितो. मी १४ वर्षांचा होतो. भुगोलाचा तास सुरु होता. त्यावेळी एक शिक्षिका आल्या. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापकांनी तुला बोलावलं आहे. मी खोडकर होतो. खूपच खोडकर होतो. तुम्ही प्रियंकालाही विचारू शकता. मला वाटलं आता शिक्षा करण्यासाठी मला बोलावलं गेलं आहे. मात्र मला माझ्या ज्या शिक्षिकेने निरोप दिला त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते. मी मुख्याध्यापकांच्या दालनाकडे जाऊ लागलो. त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा मला मुख्याध्यापकांनी सांगितलं की राहुल तुझ्या घरून फोन आला आहे. त्यावेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझं मन मला सांगू लागलं की काहीतरी वाईट घडलं आहे. माझे पाय कापू लागले. मी फोन कानाला लावला तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी एक बाई ओरडून सांगत होती, आजीला गोळ्या मारल्या, आजीला गोळ्या मारल्या हे सांगत होती. मी त्यावेळी १४ वर्षांचा होतो. जे आत्ता तुम्हाला मी सांगतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, डोवल यांना कळणार नाही. मात्र काश्मीरच्या लोकांना मी काय म्हणतोय ते समजेल. मला त्या बाईने फोनवर सांगितलं की तुझ्या आजीवर गोळ्या झाडल्या. मला कारमधून घरी नेण्यात आलं. त्यावेळी मी ती जागा पाहिली जिथे माझ्या आजीचं रक्त सांडलं होतं. त्यानंतर वडील आले, आई आली. आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तर तुम्हाला हेच सांगू इच्छितो की मी हिंसा पाहिली आहे.

माझ्या वडिलांनाही ठार करण्यात आलं

आमचा मोबाइलकडे पाहण्याचाही दृष्टीकोन वेगळा आहे. हा आमच्यासाठी फक्त टेलिफोन नाही. या घटनेनंतर सहा-सात वर्षांनी आणखी एक घटना घडली. २१ मे चा दिवस होता. पुलवामामध्ये आपले सैनिक मारले गेले तिथे फोन आला असेल. काश्मिरींच्या घरी फोन आले असतील. त्यावेळी मला फोन आला तो माझ्या बाबांच्या मित्राचा होता. त्यांनी मला फोनवर सांगितलं राहुल वाईट बातमी आहे. मी त्यांना म्हटलं हो मला समजलं आहे की बाबा आता आपल्यात नाहीत. त्यावर ते हो म्हणाले मी त्यांना थँक्स म्हटलं आणि फोन ठेवला. जो हिंसाचार घडवतो जसं मोदी आहेत, अमित शाह आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा अजित डोवल असतील ते या वेदना काय असतात? हे समजू शकणार नाहीत. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील तेव्हा काय वाटलं असेल ते मी समजू शकतो माझी बहिण समजू शकते.

भारत जोडो यात्रेने काय साधलं?

मला एका पत्रकाराने विचारलं भारत जोडो यात्रेने काय साधलं? काश्मीरमध्ये येऊन काय साध्य केलं. मी त्याचं उत्तर दिलं नाही. मी आज हे उत्तर देतो आहे की अशा प्रकारचे फोन कॉल येणं त्या वेदना त्या मुलांना, आईला न होणं हे बंद झालं पाहिजे असं माझं लक्ष्य आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला शिव्या देतात. पण मी त्यांचे आभार मानतो. कारण मला ते जेवढ्या शिव्या देतील त्यातून मी शिकत जातो. मात्र मी जे तुम्हाला सांगितलं ते काश्मिरी लोकांसाठी असेल, भारतीयांसाठी असेल, महात्मा फुलेंचा विचार असेल किंवा इतर समाजसुधारकांचा विचार असेल त्यांनी एक विचारधारा मांडली आहे. त्या विचारधारेची शिकवण टीकावी म्हणून मी भारत जोडो यात्रा काढली आहे. मी ही भारत जोडो यात्रा काँग्रेस पक्षासाठी नाही काढली तर माझ्या भारताच्या जनतेसाठी काढली आहे. जी विचारधारा देशाचा पाया मोडण्याचा प्रयत्न करते आहे त्याविरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. तिरस्काराने नाही तर प्रेमाने आपण या विरोधात उभं राहिलं पाहिजे. जर आपण प्रेमाने उभे राहिलो तर आम्हाला यश मिळेल हे आम्हाला माहित होतं. आपल्याला हा विचारधारा फक्त संपवायची नाही ती सगळ्यांच्या मनातून काढायची आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आपला देश बंधुभाव आणि प्रेम शिकवणारा देश आहे

भाजपाने आपल्याला जगण्याची एक पद्धत दाखवली आहे. मात्र भारत हा प्रेम, आपुलकी, बंधुभाव पसरवणारा देश आहे त्यादृष्टीने भारत जोडो यात्रा काढून आम्ही नफरत के बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने आये थे. आम्ही त्याच दृष्टीने एक प्रयत्न केला. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:00 IST
ताज्या बातम्या