प्रभू श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते ते रडत होते कारण अजूनही मंदिर निर्मिती झालेली नाही. मंदिर निर्मिती न झाल्याने फक्त रामाचे भक्तच नाहीत तर स्वतः प्रभू श्रीरामही निराश झाले आहेत असे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसिम रिझवी यांनी म्हटले आहे. सोमवारी रात्री माझ्या स्वप्नात प्रभू श्रीराम आले, ते दुःखी झाले होते आणि रडत होते. भारतातील कट्टरपंथी मुस्लिम पाकिस्तानच्या झेंड्याला इस्लामचा झेंडा समजतात आणि त्या देशावर प्रेम करणे आपले इमान समजतात. असेच लोक रामजन्मभूमीवर हक्क सांगत आहेत. अयोध्या रामाचे जन्मस्थान आहे मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

‘वहाबी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने पाकिस्तानकडून पैसे घेऊन काँग्रेसला हाताशी धरत अयोध्या प्रश्न चिघळवला असाही आरोप त्यांनी केला. भारतात राम मंदिर आणि बाबरीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या प्रेतांच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम कट्टरपंथीय पाकिस्तानकडे पैसे बक्षीस म्हणून मागतात. अयोध्येत श्रीरामाचे मंदिरच झाले पाहिजे आणि त्यासंदर्भातला निर्णय आता लवकरात लवकर झाला पाहिजे. राम भक्तच नाहीत तर प्रभू रामही या संपूर्ण प्रकरणामुळे हताश झाले आहेत असे मला वाटते असेही रिझवी यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर आणि बाबरी मशिद यांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले आहे. ही जमीन नेमकी कोणाची आहे यावरची सुनावणी अद्याप बाकी आहे. त्यातच शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसिम रिझवी यांनी प्रभू श्रीराम हे आपल्या स्वप्नात रडत होते असे म्हटले आहे. ‘नवभारत टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सुप्रीम कोर्ट अयोध्या प्रकरणी शुक्रवारी मोठा निर्णय देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसिम रिझवी यांचे एक वक्तव्य समोर आले आहे.