रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आता आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पर्दाफाश करणार असल्याचे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. भाजपचे खासदार महेश गिरी कालपासून केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसले आहेत. स्वामी यांनी सोमवारी सकाळी गिरी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.
स्वामी म्हणाले, केजरीवाल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त घोटाळेच केले आहेत. आपण आयआयटीमधील गुणवंत विद्यार्थी होतो, असे केजरीवाल सांगत असले तरी त्यांनी तिथे प्रवेश कसा मिळवला, याचे माझ्याकडे काही पुरावे आहेत. ते मी लवकरच पत्रकार परिषदेत उघड करणार आहे. आतापर्यंत मी राजन यांच्या मागे होते आणि आता ते जाणार आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.
नवी दिल्ली महापालिकेतील अधिकारी एम. एम. खान यांचा नुकताच खून झाला. या खुनामध्ये महेश गिरी यांचा हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. त्यामुळे केजरीवाल यांनी तातडीने आपली माफी मागावी, या मागणीसाठी महेश गिरी रविवारपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसले आहेत.