उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यातून धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे अशी की यावर्षी राज्यातल्या १५० शाळांमधून परीक्षेसाठी बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही. १५० शाळा आणि कॉलेजमधील दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थ्यी नापास झाले आहेत. गेल्या काही वर्षांत परीक्षेत कॉपी करून पास होण्याचं प्रमाण वाढलं होतं. तेव्हा कॉपीला आळा घालण्यासाठी राज्यातील परीक्षा केंद्रावर कडक उपाययोजना करण्यात आली होती. अर्थात कॉपी करणाचं प्रमाण घटलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या नापास होण्याचं प्रमाणही तितकंच वाढलं आहे.

यावर्षी राज्यातील १५० सरकारी आणि खासगी शाळांतील एकाही विद्यार्थ्याला पास होता आलं नाही असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं म्हटलं आहे. ९८ शाळांतील दहावीला बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही. तर राज्यातील ५२ कॉलेजमधल्या बारावीची परीक्षा दिलेल्या एकाही विद्यार्थ्याला परीक्षेत पास होता आलं नाही. नापास विद्यार्थ्यांचं प्रमाण गाजीपुर जिल्ह्यात अधिक आहे तर त्यानंतर आग्र्याचा नंबर लागतो. आग्रा जिल्ह्यातून यावर्षी फक्त ६५% टक्के विद्यार्थीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. तर राज्यातील २३७ शाळांमधली आकडेवारी पाहिली तर या शाळांतून फक्त २० टक्के विद्यार्थीच परीक्षा पास होऊ शकले आहेत.