भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या असमान्य स्तरावर पोहोचले आहेत, आपण भारतासारख्या अतुलनीय देशाचा प्रथमच दौरा केला आणि त्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधांमध्ये भरपूर प्रगती झाली असून अमेरिका भारतासमवेत मोठा व्यापार करणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली असतानाही ट्रम्प यांनी वरील मत व्यक्त केले आहे. भारत दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर ट्रम्प येथे वार्ताहरांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत, महान गृहस्थ आहेत, भारत हा अतुलनीय देश आहे, असे ट्रम्प म्हणाले. भारतामध्ये आमचे यथोचित स्वागत करण्यात आले, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे, अमेरिका भारतामध्ये मोठा व्यापार करणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, दिल्लीत हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याबद्दल ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून सॅण्डर्स यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे नेतृत्वाचे अपयश आहे, असे सॅण्डर्स यांनी म्हटले आहे. दिल्लीतील हिंसाचार हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते.