भारताला संधी करण्यासाठी अमेरिका किंवा चीन अशी निवड करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत भारताने चीनला स्पर्धक मानू नये, असा सल्लाही अमेरिकेने दिला आह़े  ओआरएफ या संस्थेच्या येथील एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेच्या संरक्षण सचिव चक हेगेल यांनी हा सल्ला दिला़  भारत आणि अमेरिकेने त्यांच्या संरक्षण संधी अधिक विस्तृत कराव्यात आणि संरक्षणविषयक सहकार्य करारांत जपानचाही अंतर्भाव करावा, असेही हेगेल पुढे म्हणाल़े
ज्याप्रमाणे अमेरिकेला कोणतेही सहकार्य करार करताना अन्य आशियाई देश किंवा चीन अशी निवड करण्याची आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे भारतालाही अमेरिकेशी असलेले निकटचे संबंध किंवा चीनशी सुधारणाचे संबंध अशी निवड करण्याची आवश्यकता नाही़  अमेरिकेला जगभरात शांतता नांदणे अपेक्षित आहे आणि त्या प्रक्रियेत चीन हाही एक विश्वस्त आह़े  त्यामुळे भारत आणि अमेरिका दोघांनी भविष्यातही चीनबरोबर काम करणे सुरूच ठेवावे, असेही हेगेल म्हणाल़े
चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावरील स्वामित्वाबाबत सुरू असलेल्या वादावरही चर्चेतून आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा, असेही ते म्हणाल़े  भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी साहाय्य करण्याचे, तसेच जी२० देशांची कार्यकक्षा वाढविण्यासाठी आणि भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे आजीव सभासदत्व मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचेही आश्वासनही त्यांनी या वेळी दिल़े
शपथविधीसाठी सार्क राष्ट्रांना बोलाविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निर्णयाचे हेगेल यांनी कौतुक केल़े  हे पाऊल पाकिस्तान आणि अन्य शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याप्रति मोदी सरकारची बांधीलकी दर्शविते, असे ते म्हणाल़े
रणगाडाभेदी ‘जवेलिन’ या क्षेपणास्त्राच्या पुढील आवृत्तीच्या संयुक्त निर्मितीसाठीही अमेरिकेने भारताला आवतण दिल़े  दोन्ही देशांतील प्रशासकीय लालफीतशाहीने उभय देशांतील संरक्षण सहकार्याला बद्ध करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़
मोदींचे वडील चहाविक्रेते
जगाच्या पाठीवर केवळ दोनच असे लोकशाही देश आहेत, जिथे ‘एका चहाविक्रेत्याचा मुलगा’ पंतप्रधान होऊ शकतो किंवा एखाद्या केनियन नागरिकाचा मुलगा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो, असे कौतुकोद्गार हेगेल यांनी काढल़े  अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील साम्य दर्शवून दोघांचेही कौतुक करण्याचा त्यांचा मानस होता; परंतु या कौतुकावेगात मोदी यांचे वडील नव्हे तर स्वत: मोदी हेच चहाविक्रेते होते, या संदर्भाचे हेगेल यांना विस्मरण झाल़े