तिमाही अर्थवृद्धी दर २०.१ टक्क्य़ांवर; गतवर्षांतील उणे दराच्या तुलनेत प्रगती

नवी दिल्ली : भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये सरलेल्या एप्रिल ते जून २०२१ तिमाहीत २०.१ टक्क्य़ांची वाढ नोंदविण्यात आली. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केलेली ही आकडेवारी सर्वसाधारण अंदाजाच्या जवळच असली तरी, रिझव्‍‌र्ह बँकेने अनुमान केलेल्या २१.४ टक्क्य़ांच्या दरापेक्षा कमी नोंदली गेली आहे.

२०११-१२ च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन ३२.३८ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो २६.९५ लाख कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन हे १८.८ टक्क्य़ांच्या वाढीसह ३०.४८ लाख कोटी रुपये राहिले, जे गत वर्षी याच तिमाहीत २५.६६ लाख कोटी रुपये होते.

गेल्या वर्षी करोनाचा पहिला तडाखा आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीने जवळपास ठप्प झालेल्या अर्थचक्राचे प्रतिबिंब हे उणे २४.४ टक्क्य़ांपर्यंत तळात पोहोचले होते. त्या तुलनेत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असून एप्रिल-जून २०२१ तिमाहीत दिसून आलेली वाढ ही आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम विनाखंड सुरू राहिल्याचे सूचित करणारी आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

आधीच्या म्हणजे, जानेवारी ते मार्च २०२१ तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर १.६ टक्के नोंदविण्यात आला होता, जो सलग तीन तिमाहीत नकारात्मकतेनंतर, जीडीपी वाढीत दिसून आलेली ही सकारात्मक वाढ होती.

तरीही अंदाजापेक्षा कमीच..

रिझव्‍‌र्ह बँकेने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीत एप्रिल-जून २०२१ तिमाहीसाठी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर २१.४ टक्के राहण्याचे अनुमान व्यक्त केले होते. त्या पूर्वीचा मध्यवर्ती बँकेचा कयास २६.४ टक्क्य़ांच्या होता, तो तिने नंतर सुधारून कमी केला असला तरी प्रत्यक्षात पुढे आलेली आकडेवारी ही सुधारीत अंदाजापेक्षाही कमी नोंदली गेली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ९.५ टक्क्य़ांचा अंदाज वर्तविला असला तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता तो आणखी घसरू शकेल, असा इशाराही दिला आहे.

महत्त्व का? गेल्या वर्षी याच तिमाहीत देशाचा जीडीपी उणे २४.४ टक्के म्हणजे साडेचार दशकांच्या नीचांकी पातळीवर नोंदला गेला होता. त्या निम्नस्तराशी तुलना रूपात प्रस्तुत झालेल्या यंदाच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीने मोठी झेप घेतलेली दिसून येते.

वाढीची कारणे..

एप्रिल-जून २०२१ तिमाहीत आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम विनाखंड राहिले. व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, शेती या क्षेत्रांत वृद्धी दिसून आली.