काळ्या पैशाचे माहेरघर असलेल्या स्वित्र्झलडमध्ये भारतातील काही लोकांचा काळा पैसा असला तरी तेथे काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान ६१ पर्यंत खाली आले आहे तर पाकिस्तान ७३ व्या स्थानावर आहे. जगातील १.६ अन्त्य डॉलर्स इतका काळा पैसा स्वित्र्झलडमध्ये असून त्यात केवळ ०.१२३ टक्के भारतीय पैसा आहे.
स्वीस बँकांच्या ग्राहकांत ब्रिटन व अमेरिका आघाडीवर असून यूबीएस व क्रेडीट सुसी या दोन बँकात दोन तृतीयांश काळा पैसा ठेवलेला आहे, या दोन बँकात भारतीयांचा ८२ टक्के काळा पैसा आहे. स्वीस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा स्वीस बँकांतील काळा पैसा १० टक्क्य़ांनी कमी झाला असून तो २०१४ मध्ये  १.८ अब्ज स्वीस फ्रँक ( १.९८ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे १२६१५ कोटी रुपये) इतका होता. जगातील जो काळा पैसा स्वीस बँकांत आहे त्याच्या हे प्रमाण ०.१२३ टक्के आहे. २०१३ मध्ये भारताचा स्वीस बँकांतील काळापैसा ४० टक्के वाढला होता पण नंतर एनडीए सरकारने काळ्या पैशाविरोधात कारवाई सुरू करताच हे प्रमाण कमी झाले. असे असले तरी विविध देशांतील भारतीय नागरिकांचा काळा पैसा या हिशेबात धरलेला नाही. वर्षांपूर्वी भारतीयांचा १.३६ अब्ज स्वीस फ्रँक इतका काळा पैसा तेथे होता आता तो १.४८ अब्ज स्वीस फ्रँक आहे. स्वित्र्झलडमध्ये २७५ बँका असून यूबीएस व क्रेडिट सुसी या मोठय़ा बँका आहेत. तेथे परदेशी नियंत्रण असलेल्या बँका आहेत. ब्रिटन व अमेरिका यांचा काळा पैसाही वाढला आहे. पाकिस्तानचा काळा पैसा ४७२ दशलक्ष स्वीस फ्रँक असून तो तेथील सर्व देशांच्या १.३ अब्ज स्वीस फ्रँकच्या ३६ टक्के आहे. पाकिस्तान ७३ व्या क्रमांकावर आहे. स्वित्र्झलडमधील काळ्या पैशात पहिल्या दहा देशात ब्रिटन, अमेरिका, वेस्टइंडिज, गुर्नसे, बहामाज, लक्झेमबर्ग, फ्रान्स, जेरेसी व हाँगकाँग यांचा समावेश आहे. ब्रिटनचा तेथील एकूण काळ्या पैशात २२ टक्के वाटा आहे. २०१४ च्या आकडेवारीनुसार पहिल्या चार देशांचे १.४७ अन्त्य स्वीस फ्रँक (१०२ लाख कोटी किंवा १.६ अन्त्य (ट्रिलीयन डॉलर्स) तेथे आहेत.