भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून संशोधन करणारे वाहन रशियाकडून मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने आणि देशी प्रक्षेपक यानाच्या निर्मितीसाठीही बराच अवधी असल्याने ही मोहीम रखडण्याचीच चिन्हे आहेत.
‘चांद्रयान-१’ मोहिमेद्वारे दूरनियंत्रक उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे व माहिती गोळा करण्यात आली होती. आता ‘चांद्रयान-२’ मोहिमेद्वारे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर दूरनियंत्रकाद्वारे नियंत्रित वाहन चंद्रावर उतरणार होते. त्यातील उपकरणांद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाच्या तपासणीसाठी अत्यंत उपयुक्त असे नमुने गोळा केले जाणार होते. त्यामुळे ‘चांद्रयान-१’ मोहिमेच्या निष्कर्षांना ‘चांद्रयान-२’ मोहिमेने साधार पाठबळ लाभणार होते. आता ही मोहीमच रखडल्याने भारताच्या अंतराळ संशोधनास मोठाच हादरा बसला आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका अधिकाऱ्याने सांगितले.
चंद्राच्या पृष्ठभागाचे सखोल संशोधन करण्यासाठी संयुक्त चांद्रमोहिमांकरिता ‘इस्रो’ आणि रशियन अंतराळ संशोधन संस्था (रॉस्कॉस्मॉस) यांच्यात नोव्हेंबर २००७ मध्ये करार झाला होता. त्यानुसार चांद्रयान-२ मोहिमेची घोषणाही करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार भारताच्या जीएसएलव्हीद्वारे चांद्रयान-२ चंद्राकडे झेपावणार होते. या यानाच्या प्रवासाची मुख्य जबाबदारी इस्रोकडे होती तर चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधनासाठी उतरणारे उपकरणसज्ज वाहन तयार करण्याची जबाबदारी रशियाची होती.
भारताने २००८ मध्ये पहिली चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पाडली त्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेबाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ही मोहीम नेमकी कधी सुरू होईल, याबाबत काहीही सांगण्यास इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन् यांनी नकार दिला. रशियाकडून संशोधनासाठीचे वाहन मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने या मोहिमेची कालमर्यादा आताच सांगता येत नाही, असे ते म्हणाले.
मंगळाच्या संशोधनासाठी रशियाने दीड वर्षांपूर्वी पाठविलेले ‘फोबोस-ग्रंट’ यान अपेक्षित पल्ला गाठण्याआधीच प्रशांत महासागरात कोसळले. त्यामुळे अंतराळ यानांच्या विकासाबाबत आम्ही नव्याने संशोधन व चाचण्या करीत आहोत. त्यांना दोन ते तीन वर्षे लागतील, असे रशियन अंतराळ संशोधन संस्थेने कळविले आहे. त्यामुळे चांद्रयान-२ चा कालावधी या घडीला निश्चितपणे सांगता येत नाही, असे राधाकृष्णन् यांनी सांगितले.