सॅनफ्रान्सिको पाठोपाठ थेट मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ उभे राहत असून त्याचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अशा स्वरुपाचे जगातील हे दुसरे केंद्र आहे. जागतिक अर्थ मंचाच्या वतीने दिल्लीत ‘औद्योगिक क्रांती केंद्र ४.०’चे आयोजन करण्यात आले होते.

या केंद्राचे महत्त्व स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यत तंत्रज्ञानाचा वापर साह्य़कारी ठरला आहे. हे केंद्र मुंबईत स्थापन होत असल्याने आता शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तवता येतील. शेतीमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय साधता येऊ शकेल. हवामान बदलानुसार पीक पद्धतीतही बदल करणे शक्य होईल. पीक साखळी निर्माण करणे, रोगांवरील उपाय, दुष्काळ परिस्थितीवरही उपाय शोधणे सोपे होणार आहे.

औद्योगिक क्रांती केंद्राच्या मदतीने ड्रोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा करता येतील. भविष्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचा अधिकाधिक वापरऔद्योगिक क्रांती केंद्राच्या साह्य़ाने करणे शक्य होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.